वाहतूक व्यवस्थेला बळकटी

वाहतूक व्यवस्थेला बळकटी

हेमलता वाडकर : सकाळ वृत्तसेवा
ठाणे : ठाणे आणि नजीकच्‍या शहरांची कोंडी फोडत वाहतूक व्यवस्था बळकट करणारे अनेक महत्त्‍वाकांक्षी प्रकल्प येत्या काही काळात मार्गी लावण्याच्या दिशेने पुढचे पाऊल टाकण्यात आले आहे. यामध्ये ठाणेकरांच्या दृष्टीने सर्वात महत्त्‍वाचा प्रकल्प म्हणजे अंतर्गत वर्तुळाकार मेट्रो हा असेल. मुंबई मेट्रोचा विस्तार ठाणे ते मिरा रोड आणि कल्याण- तळोजा करण्यात येत आहे. अशावेळी ठाणे शहरातील अंतर्गत वाहतूकही वर्तुळाकार मेट्रोने सुरळीत करण्याच्या प्रकल्पाला राज्य सरकारने अर्थसंकल्पाच्या निमित्ताने हिरवा कंदील दिला आहे. गेल्या अनेक वर्षांपासून रखडलेला ठाणे-वसई जलवाहतूक प्रकल्पाला नवसंजीवनी देण्याचा निर्णय राज्याच्या अर्थसंकल्पात घेण्यात आला आहे. त्यामुळे मुंबईवरून थेट ठाणे, कल्याण, डोंबिवली, वसई आणि नवी मुंबई असा जलप्रवास दृष्टिक्षेपात आला आहे.

ठाणे शहरातील वाढती गर्दी, प्रवासासंबंधातील समस्या, तसेच वाहतुकीची वाढती गरज लक्षात घेता अंतर्गत वर्तुळाकार मेट्रो प्रकल्पाचा पर्याय पुढे आला. चार वर्षांपूर्वी मार्च २०१९ मध्‍ये तत्कालीन राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये नवीन ठाणे ते ठाणे या २९ किमीसाठी १० हजार कोटींच्या प्रकल्पाला मंजुरी देण्यात आली होती. त्यानुसार महाराष्ट्र मेट्रो रेल कॉर्पोरेशनच्या माध्यमातून ठाणे महापालिका हा प्रकल्प राबवणार आहे.
--------------------
२० उन्नत व दोन भुयारी अशी स्थानके
नवीन ठाणे, रायलादेवी, वागळे चौक, लोकमान्यनगर बस डेपो, नीलकंठ टर्मिनल, गांधीनगर, डॉ. काशिनाथ घाणेकर नाट्यगृह, मानपाडा, डोंगरीपाडा, वाघबीळ, वॉटरफ्रंट, पातलीपाडा, आझादनगर बस स्थानक, मनोरमानगर, कोलशेत, बाळकूम नाका, बाळकूम पाडा, राबोडी, शिवाजी चौक आणि ठाणे अशी २२ स्थानकेही निश्चित करण्यात आली आहेत. यामध्ये २० उन्नत, तर दोन भुयारी अशी स्थानके असणार आहेत.
-----------------------------
ठाणेकरांच्‍या अपेक्षा पूर्ण होणार
मुंबईहून येणाऱ्या मेट्रोला ही सर्व स्थानके जोडली जाणार आहेत. त्यामुळे मेट्रोतून उतरल्यानंतर इच्छित स्थळी जाण्यासाठी नव्याने रिक्षा किंवा बसची प्रतीक्षा न करता प्रवाशांना वर्तुळाकार मेट्रोचा पर्याय उपलब्ध राहणार आहे. वास्तविक या प्रकल्पाचे काम आधीच हाती घेण्याचे नियोजन होते; पण मध्यंतरी आलेल्या कोरोनामुळे रखडलेल्या प्रकल्पांच्या यादीमध्ये वर्तुळाकार मेट्रो प्रकल्पही गेला, पण आता यंदाच्या अर्थसंकल्पामध्ये नवीन प्रकल्प म्हणून ठाण्याच्या अंतर्गत वर्तुळाकार प्रकल्पाचा समावेश झाल्याने आशा पल्लवीत झाल्या आहेत. हा प्रकल्प मार्गी लागल्यास शहरातील वाहतुकीलाही शिस्त येऊन भविष्यात वाढणाऱ्या गर्दीला ब्रेक लावण्यात यश येईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
----------------------------------------
---------------------------------------------------------
जलवाहतूक दृष्‍टिक्षेपात
राज्याचे उपमुख्यमंत्री तथ अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सादर केलेल्या अर्थसंकल्पामध्ये जलवाहतुकीला प्राधान्य दिले आहे. मुंबई सभोवतालच्या जलवाहतुकीसाठी ठाणे व वसई खाडी एकमेकांना जोडण्यासाठी ४२४ कोटींचे काम हाती घेण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले. गेट वे ऑफ इंडियाजवळ रेडिओ क्लबनजीक प्रवासी जलवाहतुकीसाठी जेट्टी व संबंधित सुविधा उभारण्यासाठी १६२ कोटी रुपयांच्या प्रकल्पास मान्यता देण्यात आली आहे. त्यामुळे दक्षिण मुंबईहून कल्याण, डोंबिवली, ठाणे, वसई खाडी, नवीन मुंबई अशी जलमार्गाने प्रवासी वाहतूक शक्य होणार आहे.
-------------------------------------
जलवाहतुकीचे वरदान
ठाणे शहराला लाभलेल्या ३२ किमी लांबीचा खाडी किनारा आणि रस्ते व अन्य प्रवासाच्या ताणावर नवा पर्याय म्हणून सहा-सात वर्षांपूर्वी ठाणे महापालिकेने सहा महापालिकांना जोडणाऱ्या जलवाहतुकीच्या प्रकल्पाची ओळख करून दिली.

प्रकल्पाला केंद्र सरकारनेही मंजुरी देत सागरमाला योजनेतून ९८ कोटी निधी देण्याचे मान्य केले आहे. त्यानुसार महाराष्ट्र मेरीटाईम बोर्डामार्फत कामे कार्यान्वित झाली असून, अनेक ठिकाणी जेट्टी बांधण्याचे काम सुरू करण्यात आले.

२०१९ मध्ये घडलेल्या राजकीय घडामोडींनंतर हा प्रकल्प काहीसा धक्क्याला लागला. आता केंद्रात भाजप आणि राज्यात भाजप-शिवसेना सरकार असल्यामुळे सहा वर्षांपासून रखडलेला ठाणे खाडी जलवाहतुकीचा मार्गही यानिमित्ताने सुकर करण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे.

ठाणे-वसई-कल्याण हा ५४ किमी लांबीचा जलवाहतूक मार्ग प्रस्तावित असून यामध्ये १० ठिकाणी जेट्टी बांधण्यात येणार आहेत. हे काम मार्गी लागल्यास लोकल तसेच रस्ते वाहतुकीवरील ताण कमी होण्यास मोठी मदत मिळणार आहे.

डोंबिवली, ठाणे, कल्याण, वसई आणि भाईंदर ही महत्त्‍वाची चार शहरे एकमेकांशी जलवाहतुकीने जोडली जाणार आहेत. रस्ते किंवा लोकलच्या तुलनेत जलवाहतूक जलद आणि खिशाला परवडणारी असणार आहे.

---------------------------------------------------------
अर्थसंकल्पातील ठाण्यासाठी ठळक मुद्दे

• मुंबई मेट्रो १० : गायमुख ते शिवाजी चौक मिरा रोड. लांबी ९.२ कि.मी. अंदाजित खर्च ४४७६ कोटी
• मुंबई मेट्रो १२ : कल्याण ते तळोजा. २०.७५ कि.मी. लांबी ५८६५ कोटी रुपये खर्च
• एमएमआर क्षेत्रात पारसिक हिल्स बोगदा, मिरा-भाईंदर पाणीपुरवठा, मुंबई पारबंदर प्रकल्प, विविध उड्डाण पुलांचे काम मार्गी.
• स्टार्टअपसाठी कळंबोली, नवी मुंबई येथे निवासी प्रशिक्षण-संशोधन संस्था.
• नवी मुंबईत जेम्स अँड ज्वेलरी पार्क, प्रयोगशाळानिर्मित हिऱ्यांच्या उद्योगाला चालना
• मानसिक अस्वास्थ्य आणि व्यसनाधीनतेची वाढती समस्या पाहता भिवंडी येथे नवीन व्यसनमुक्ती केंद्रे.
• ठाणे आणि कोल्हापुरात अत्याधुनिक मनोरुग्णालयासाठी ८५० कोटी रुपये.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com