आॅन ड्युटी

आॅन ड्युटी

फोटो ः MBI23B07911 आणि MBI23B07912


आॅन ड्युटी

देशातील पहिली फायर वुमन!

स्वाती सातपुते
फायर वुमन
---
मिलिंद तांबे, मुंबई
अग्निशमन दलातील ‘फायरमन’ म्हणजे पुरुषांची मक्तेदारी मानली जाते; परंतु त्यातही आता महिलांनी आपला वेगळा ठसा उमटवायला सुरुवात केली आहे. भायखळा अग्निशमन दलातील स्वाती सातपुते देशातील पहिल्या ‘फायर वुमन’ म्हणजेच ‘महिला अग्निशामक’ ठरल्या. आपल्या सेवेचा त्यांना अभिमान आहे.

साधारण १० वर्षांपूर्वी मुंबई अग्निशमन दलात महिलांची भरती सुरू झाली. ती संधी साधत नगर जिल्ह्यातील आष्टी तालुक्यातील स्वाती सातपुते यांनी अग्निशमन दलात प्रवेश केला. आज ३८ वर्षांच्या असलेल्या सातपुते देशातील पहिल्या ‘फायर वुमन’ ठरल्या आहेत. नगर जिल्ह्यातील एका खेड्यात त्यांचे शिक्षण झाले. धाडसी खेळामध्ये त्या नेहमी पुढे असत. लहानपणापासून त्यांना गणवेशधारी नागरी सेवेत काम करण्याची इच्छा होती; पण त्यांनी लग्नापर्यंत कोणतीही नोकरी केली नाही. लग्नानंतर त्या मुंबईत स्थायिक झाल्या. घरात उद्‍भवलेल्या काही संकटांमुळे त्यांना नोकरीची गरज भासू लागली. २०११ मध्ये एका भिंतीवर लागलेल्या पोस्टरवरून त्यांना मुंबई अग्निशमन दलामध्ये महिलांसाठी भरती असल्याची माहिती मिळाली. तेव्हाच त्यांनी भरती प्रक्रियेमध्ये उतरण्याचा निर्णय घेतला.
अग्निशमन दलामध्ये भरती होण्यास घरचे विरोध करतील म्हणून सातपुते यांनी त्याबाबत कुणालाच माहिती दिली नाही. फक्त आपल्या सासूबाईंना सांगून त्यांनी भरती प्रक्रियेची तयारी सुरू केली. त्यात उत्तीर्ण होऊन प्रत्यक्ष सहा महिन्यांचे प्रशिक्षण सुरू झाले तरी घरातील इतरांना त्याबद्दल काहीही माहीत नव्हते. प्रशिक्षण पूर्ण होऊन भायखळा केंद्रात अग्निशमन दलामध्ये सातपुते भरती झाल्या तेव्हा त्या देशातील पहिल्या ‘फायर वुमन’ ठरल्या. आनंदाची बातमी घेऊन त्या आपल्या घरी पोचायच्या आधीच तिथे पोलिस आणि पत्रकार हजर होते. त्यांच्याकडूनच त्यांच्या कुटुंबीयांना त्या अग्निशमन दलामध्ये ‘महिला अग्निशामक’ झाल्याची बातमी मिळाली होती.
स्वाती सातपुते नंतर दलातर्फे अनेक ‘कॉल्स’वर गेल्या. आग, इमारत कोसळणे, रस्ते अपघात, पक्षी-प्राणी अडकणे इत्यादी दुर्घटना त्यांनी हाताळल्या आहेत. दिवसाला तीन ते चार कॉल त्या घेतातच. प्रशिक्षणादरम्यान वरिष्ठांकडून योग्य प्रशिक्षण मिळाल्याने अनेक कठीण आपत्कालीन परिस्थिती त्यांना सहज हाताळता आली. काळबादेवी आणि भायखळ्यातील कॉल आयुष्यात कधीही न विसारणारे होते, असे त्या सांगतात. काळबादेवीतील जुनी लाकडाची इमारत कागदाच्या पुठ्ठ्याप्रमाणे जळत होती. आग, कोंदट धूर आणि धडाधड पडणारी जळकी लाकडे यांचा सामना करत आत शिरत त्यांना फायर फायटिंग करावी लागली. दुर्घटनेत अनेक वरिष्ठ अधिकारीही शहीद झाले. रेस्क्यू ऑपरेशनदरम्यान मोठी जोखीम त्यांना पत्करावी लागली. अशाच प्रकारचा अनुभव भायखळ्यातील मेमनवाडीमधील इमारत कोसळली त्या वेळी त्यांना आला. तिथे त्यांना अचानक जावे लागले होते. त्या पोचल्या तेव्हा इमारतीच्या ढिगाऱ्याखाली अनेक रहिवासी अडकले होते. त्यांची सुटका करण्यासाठी त्या उतरल्या तेव्हा त्यांच्या अंगावर इमारतीचा भाग कोसळण्याचा धोका होता. तरीही त्यांनी रेस्क्यू ऑपरेशन सुरू केले. इमारतीच्या आत दबलेल्या अनेकांचा मृत्यू झाला होता. ती घटना आठवली तरी त्यांच्या अंगावर काटा उभा राहतो. वरळीतील गॅसगळतीचा कॉलही त्यांची परीक्षा पाहणारा ठरला. रेस्क्यूसाठी उतरलेल्या सातपुते यांना धुरामध्ये गुदमरून त्रास झाला होता. उपचारासाठी त्यांना आठ-दिवस केईएम रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.

कुटुंबाआधी फक्त कर्तव्य!
स्वाती सातपुते यांना खरे तर पोलिस विभागात जायचे होते. मात्र, परिस्थितीमुळे त्या अग्निशमन दलामध्ये दाखल झाल्या. तेथील काम त्यांनी मनापासून स्वीकारले. त्यासाठी आवश्यक प्रशिक्षण घेतले. कामातील ‘रिस्क’ न बघता आम्ही त्यातील ‘जनसेवा’ पाहतो. कुणाचे प्राण आम्ही वाचवतो तेव्हा मोठे आत्मिक समाधान मिळते. आजही कॉल आला की आम्हाला आमचे कुटुंबीय नाही; तर फक्त कर्तव्यच दिसते. माझ्याकडे बघून अनेक मुली मलाही अग्निशमन दलामध्ये काम करण्याची इच्छा असल्याचे बोलून दाखवतात तेव्हा आनंद होतो, असे सांगताना त्यांच्या चेहऱ्यावरील समाधान स्पष्टपणे जाणवते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com