मॅक्सी कॅबला कर्मचाऱ्यांचा विरोध | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

मॅक्सी कॅबला कर्मचाऱ्यांचा विरोध
मॅक्सी कॅबला कर्मचाऱ्यांचा विरोध

मॅक्सी कॅबला कर्मचाऱ्यांचा विरोध

sakal_logo
By

सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. ११ ः एसटी महामंडळाच्या मॅक्सी कॅब आणण्याच्या धोरणाला निर्भया महिला संघटनेच्या वतीने कडाडून विरोध करण्यात आला. या निर्णयाला विरोध करण्यासाठी संघटनेच्या वतीने ९ मार्च रोजी लोणावळा येथे मेळावा घेण्यात आला. यानिमित्ताने निषेध मोर्चा काढण्यात आला होता. एसटीचे खासगीकरण बंद करा, एसटीच्या मोक्याच्या जागा हडप करू नका, अशा घोषणा या वेळी आंदोलकांनी दिल्या.

खासगी मॅक्सी कॅब परिवहन सेवेत आणण्याचा निर्णय एसटी महामंडळाने घेतला आहे. महामंडळाकडून मोठ्या प्रमाणात खासगीकरणाचे धोरण राबवले जात आहे. यामुळे सार्वजनिक प्रवासी वाहतुकीवर गदा आणली जात आहे. त्याचप्रमाणे महामंडळाच्या मोक्याच्या जागा हडपण्याचा डाव आखला जात आहे, असे आरोप संघटनेकडून करण्यात आले. या सर्व धोरणांना तीव्र विरोध करण्यात येईल असे या वेळी सांगण्यात आले.

जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने महाराष्ट्र एसटी कामगार संघटनेने लोणावळा येथे निर्भया मेळाव्याचे आयोजन केले होते. यात राज्यभरातून मोठ्या प्रमाणावर महिला कर्मचारी उपस्थित होत्या. या वेळी महिला कामगारांच्या दैनंदिन प्रश्नांसोबतच उद्योगांच्या प्रश्नांवरही व्यापक प्रमाणात चर्चा करण्यात आली. या मेळाव्यातही एकमताने मॅक्सी कॅब धोरणाला विरोध केल्याचे राज्य एसटी कामगार संघटनेच्या राज्य महिला संघटक शीला नाईकवाडे यांनी सांगितले.