बोईसरमधील दरोड्यातील तीन आरोपींना अटक

बोईसरमधील दरोड्यातील तीन आरोपींना अटक

मनोर, ता. ११ (बातमीदार) : बोईसर शहरातील ओस्तवाल एम्पायर संकुलातील खासगी कार्यालयावर शस्त्रांच्या धाकाने टाकलेल्या दरोड्यातील तीन आरोपींना अटक करण्यात बोईसर पोलिसाना यश आले आहे. दरोड्यात सहभाग असलेले अन्य दोन आरोपी फरारी आहेत. बोईसरच्या ओसवाल एम्पायर संकुलाच्या रिषभ अपार्टमेंटमधील राजश्री एंटरप्राईजेसच्या कार्यालयावर आठवडाभरापूर्वी ३ मार्च रोजी दुपारी सव्वातीनच्या सुमारास पाच दरोडेखोरांनी सशस्त्र दरोडा टाकला होता. कार्यालयात काम करणारी महिला आणि तरुणाला चाकूचा धाक दाखवत, तसेच त्यांना दोराच्या साह्याने खुर्चीला बांधून कार्यालयातील रोख रक्कम, महिलेच्या गळ्यातील मंगळसूत्र, तरुणाच्या गळ्यातील सोनसाखळी आणि चहा घेऊन आलेल्या कामगाराच्या हातातील अंगठी असा लाखो रुपयांचा ऐवज लुटून दरोडेखोर पसार झाले होते.
बोईसरमध्ये दिवसाढवळ्या पडलेल्या सशस्त्र दरोड्याने मोठी खळबळ उडाली होती. दरोड्याची माहिती मिळताच पालघरचे पोलिस अधीक्षक बाळासाहेब पाटील, अप्पर पोलिस अधीक्षक पंकज शिरसाट, उपअधीक्षक (गृह) शैलेश काळे यांनी घटनास्थळी भेट देऊन बोईसर पोलिसांना तपासाबाबत सूचना दिल्या होत्या. बोईसर पोलिस ठाण्याच्या गुन्हे प्रकटीकरण शाखेचे पथक आणि स्थानिक गुन्हे शाखेने बोईसर रेल्वे स्थानकापासून दादर स्थानकापर्यंतचे सीसीटीव्ही फुटेज तपासले. तसेच तांत्रिक कौशल्याचा वापर करून बुधवारी (ता. ८) दादर येथून तिघांना ताब्यात घेतले. दरोड्यात सहभाग असलेले दोन आरोपी फरार आहेत. बोईसर पोलिसांकडून आरोपींचा शोध घेतला जात आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com