
माकडाच्या हल्ल्यात आठ वर्षीय मुलगा जखमी
कर्जत, ता. ११ (बातमीदार) : शहरातील इमारतीच्या परिसरात मुले खेळत असताना अचानकपणे माकडांनी त्यांचा पाठलाग करत त्यांच्यावर हल्ला केला. यामध्ये आठ वर्षीय मुलगा गंभीर जखमी झाला आहे. या हल्ल्यानंतर नगर परिषद वन विभागाच्या साह्याने पिंजरा लावून या माकडांचा बंदोबस्त करण्याचे काम आज (ता. ११) हाती घेतले आहे. मागील वर्षभरापासून माकडांनी कर्जत बाजारपेठेत धुमाकूळ घातला आहे. रहिवाशांच्या घरांत, तसेच दुकानांत घुसून वस्तूंची उडवाउडवी करत सामानांची मोठ्या प्रमाणात नासधूस करण्यात आली आहे. शहरातील शालिनी सदन या इमारतीच्या आवारात शाकीब खान हा मुलगा गुरुवारी (ता. ८) खेळत असताना माकडाने त्याच्यावर हल्ला केला. काही दिवसांपूर्वी महावीर पेठेमधील महिला इमारतीच्या टेरेसवर कपडे वाळत घालायला गेली असताना माकडाने तिच्यावर झडप घातली होती. त्यानंतर आताच्या घटनेने नागरिकांमध्ये अधिकच भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.