
कुडूसमध्ये दोन मुलींवर लैंगिक अत्याचार
वाडा, ता. ११ (बातमीदार) : तालुक्यातील कुडूस येथे दोन मुलींवर लैंगिक अत्याचार झाल्याच्या दोन वेगवेगळ्या घटना गुरुवारी (ता. ९) घडल्याचे उघडकीस आले. यामध्ये एका घटनेत पीडित मुलगी अल्पवयीन आहे. या दोन्ही घटनांबाबत वाडा पोलिस ठाण्यात वेगवेगळे गुन्हे दाखल झाले असून दोन्ही संशयित आरोपींना अटक करण्यात आली आहे.
कुडूस येथे एका परप्रांतीय कुटुंबातील पंधरावर्षीय मुलीवर तिच्या सावत्र बापाने अत्याचार केल्याची तक्रार तिने वाडा पोलिस ठाण्यात केली आहे. गेल्या दोन महिन्यांपासून लैंगिक अत्याचार सुरू असल्याचे मुलीने तक्रारीत म्हटले आहे. वाडा पोलिसांनी पोक्सोअंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. दुसऱ्या घटनेत कुडूस तळ्याचा पाडा येथील पायवाटेने तरुणी जात असताना या भागातच राहणाऱ्या व दारूच्या नशेत असलेल्या रवींद्र सापटे याने तिची छेड काढत अतिप्रसंग केला. या प्रकार नागरिकांना समजताच त्यांनी संशयित आरोपीला चांगलाच चोप दिला. या प्रकरणी वाडा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. या दोन्ही गुन्ह्यांचा तपास वाडा पोलिस करत आहेत.