ऑडिओ टेपमधील कुरुंदकरच्या आवाजावर शिक्कामोर्तब | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

ऑडिओ टेपमधील कुरुंदकरच्या आवाजावर शिक्कामोर्तब
ऑडिओ टेपमधील कुरुंदकरच्या आवाजावर शिक्कामोर्तब

ऑडिओ टेपमधील कुरुंदकरच्या आवाजावर शिक्कामोर्तब

sakal_logo
By

नवी मुंबई, ता. ११ (वार्ताहर) : अभय कुरुंदकर आणि अश्विनी बिद्रे यांच्या लग्नाचे फोटो लॅपटॉपमध्ये आढळून आले होते. पनवेल सत्र न्यायालयात शुक्रवारी (ता. १०) झालेल्या उलट तपासणीदरम्यान उपजिल्हाधिकारी सोपान टोपे यांनी ते ओळखले. तसेच ऑडिओ टेपमधील कुरुंदकरच्या आवाजावर टोपे यांनी शिक्कामोर्तब केले. या खटल्यातील महत्त्वाचे पंच असलेले पोलिस उपायुक्त प्रमोद शेवाळे आणि उपजिल्हाधिकारी सोपान टोपे यांची साक्ष शुक्रवारी पूर्ण झाली.

अश्विनी बिद्रे व अभय कुरुंदकर यांच्या लग्नाचे फोटो व दोघांमधील संभाषणाचे ऑडिओ, व्हिडीओ असलेले हार्डडिस्क सोपान टोपे यांच्या उपस्थितीत सीलबंद करण्यात आले होते. सदर ऑडिओ टेपमधील आवाज हा अभय कुरुंदकर याचा असल्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक व्यंकट आंधळे यांनी सांगितले होते. त्या वेळीही टोपे यांनी पंच म्हणून काम केले होते. त्यामुळे टोपे यांच्या साक्षीनंतर ऑडिओ टेपमधील कुरुंदकरच्या आवाजावर शिक्कामोर्तब करण्यात आले. या खटल्यातील पंच पोलिस उपायुक्त प्रमोद शेवाळे यांनी साक्षीदरम्यान अश्विनी बिद्रे यांनी मोबाईलवरून १४ एप्रिल २०१६ रोजी मेडिटेशनला जात असल्याचे, तसेच आजारी असल्याचा एसएमएस करून रजेची मागणी केली होती. तो एसएमएस तत्कालीन तपास अधिकारी बईकर यांना फॉरवर्ड केल्याची बाब न्यायालयासमोर सांगितली. त्याचबरोबर अश्विनी बिद्रे यांनी २० एप्रिल रोजी मुख्यालय सोडण्याची आणि २१ ते २४ एप्रिल या कालावधीत रजेच्या मागणीचा अर्ज केला होता. १४ एप्रिल २०१६ रोजी अश्विनी बिद्रे यांचा एसएमएस आला होता, हे शेवाळे यांनी उलटतपासणीदरम्यान न्यायालयासमोर सांगितले. पुढील सुनावणी १७ आणि १८ मार्च रोजी होणार आहे.

पनवेल न्यायालयात जादुटोण्याचा प्रयत्न?
अश्विनी बिद्रे हत्या प्रकरणात गेल्या आठवड्यात झालेल्या सुनावणीवेळी आरोपी अभय कुरुंदकर, राजू पाटील यांनी भरन्यायालयात मंत्रतंत्रयुक्त अंगारा फुंकल्याने सर्वच आश्चर्यचकित झाले. आरोपींनी स्वत:चा बचाव करण्यासाठी जादुटोण्याचा आधार घेतल्याची चर्चा न्यायालयात होती.