
सदानंद कदम १५ मार्चपर्यंत ईडी कोठडीत
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. ११ : दापोलीतील साई रिसॉर्टमधील कथित मनी लॉण्डरिंगप्रकरणी सदानंद कदम यांना मुंबई सत्र न्यायालयाने १५ मार्चपर्यंत ईडीची कोठडी ठोठावली आहे. ईडीने शुक्रवारी (ता. १०) चार तासांच्या चौकशीनंतर कदम यांना अटक केली. त्यानंतर त्यांना शनिवारी मुंबई सत्र न्यायालयात हजर करण्यात आले. न्यायालयात ईडीच्या वकिलांनी कदम यांना १४ दिवसांची कोठडी न्यायालयाकडे मागितली होती, परंतु न्यायालयाने त्यांना १५ मार्चपर्यंत ईडी कोठडी सुनावली आहे.
सदानंद कदम यांनी समाधानकारक उत्तर न दिल्याने त्यांना अटक करण्यात आल्याचे ईडीने सांगितले आहे. तसेच अनिल परब यांच्या खात्यातून एक कोटी रुपये विभा साठे यांना दिल्याचे आरोप ईडीच्या वकिलांनी केले आहेत. कदम यांच्या माध्यमातून ही रक्कम दिल्याचेही ईडीने म्हटले आहे. ईडीचा युक्तिवाद न्यायालयाने मान्य केला; मात्र ईडीची १४ दिवसांच्या कोठडीची मागणी फेटाळून लावली. कदम यांच्या वतीने ॲड. निरंजन मुंदरगी यांनी ईडीच्या कारवाईला न्यायालयात चांगलाच विरोध केला. ईडीने केलेली कारवाई बेकायदा असल्याचा युक्तिवाद ॲड. मुंदरगी यांनी न्यायालयात केला. तसेच कदम यांच्यावर राजकीय सूडबुद्धीने कारवाई केल्याचा आरोपही त्यांनी केला. अखेर न्यायालयाने कदम यांना १५ मार्चपर्यंत ईडी कोठडी सुनावली आहे.
कोठडीत औषधासाठी परवानगी
सदानंद कदम यांना कोठडीत असताना औषध घेण्याची परवानगी न्यायालयाकडून देण्यात आली आहे. कदम यांना रक्तदाबाचा त्रास असल्याची माहिती त्यांचे वकील निरंजन मुंदरगी यांनी न्यायालयात दिली आहे; मात्र घरचे जेवण देण्यास ईडीने विरोध केला आहे. कदम यांचा ‘डाएट प्लॅन’ सुरू असल्याचा दावा त्यांच्या वकिलांनी केला आहे.