
भाजप युवा मोर्चाचे कार्यालय जाळण्याचा प्रयत्न
ठाणे, ता. ११ (वार्ताहर) : भाजप युवा मोर्चाच्या वतीने महात्मा फुले नगर परिसरात महिनाभरापूर्वी नवीन कार्यालय सुरू करण्यात आले आहे. या कार्यालयावर दगडफेक करून रॉकेल टाकून कार्यालय जाळण्याचा प्रयत्न केला. वर्तकनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल आहे.
वर्तकनगरमधील महात्मा फुले नगरातील गगनगिरी इमारतीमध्ये राहणारे धनंजय बिस्वाल (वय ४८) यांचा टेलरिंगचा व्यवसाय आहे. त्यांच्या घराच्या वर १८ फेब्रुवारी २०२३ रोजी भाजप युवा मोर्चा कार्यालय सुरू करण्यात आले. ७ मार्च रोजी पहाटे ५ वाजण्याच्या सुमारास दोन अज्ञातांनी कार्यालयावर दगड मारून खिडकीच्या काचा फोडल्या. त्यानंतर भाजप युवा मोर्चा कार्यालयात रॉकेल ओतून पेटवण्याचा प्रयत्न केला. हा प्रकार सीसी टीव्हीत चित्रित झाला आहे. याबाबत धनंजय बिस्वाल यांनी दोन अनोळखी आरोपींविरोधात तक्रार दाखल केली केली आहे.