ठाणे ते दिवा स्वच्छतेचा अभाव, दुर्गंधीचे वातावरण

ठाणे ते दिवा स्वच्छतेचा अभाव, दुर्गंधीचे वातावरण

स्नेहा महाडिक, ठाणे
रेल्वे सेवा ही मुंबई आणि उपनगरांची लाईफलाईन आहे. आजच्या स्थितीला रेल्वेचा प्रवासी वर्ग लाखोंच्या घरात आहे. त्यामुळे रेल्वेस्थानकावरील महिला प्रसाधनगृहांची संख्या तोकडी पडत असल्याचे चित्र पाहायला मिळते. या प्रसाधनगृहात सोयी-सुविधांचा मोठा अभाव जाणवतो. त्यामुळे प्रसाधनगृहात जाणाऱ्या महिलांना पैसे देऊनही अपेक्षित सुविधा मिळत नाहीत.

ठाणे स्थानकासह कळवा, मुंब्रा आणि दिवा रेल्वेस्थानकावर महिलांचे प्रसाधनगृह स्थानकाच्या मुंबईच्या दिशेला किंवा कल्याणच्या दिशेला असल्याचे चित्र आहे. रेल्वेस्थानकाच्या एकाच बाजूला प्रसाधनगृहे असल्‍यामुळे महिलांना पायपीट करावी लागते. दुसरीकडे प्रसाधनगृहात अस्वच्छतेचा अभाव जाणवतो. प्रसाधनगृहात सुविधांचा दुष्काळ पडल्याचे चित्र आहे. ठाणे स्थानकावर महिला प्रवाशांसाठी सहा प्रसाधनगृहांची व्‍यवस्‍था आहे.
-------------------------------------------
ठाण्‍यात सर्वच ठिकाणी अस्वच्छता आणि दुर्गंधी
ठाणे स्थानकावर दिवसभरात लाखो प्रवासी येतात. त्यामुळे अशा जंक्शनच्या ठिकाणी महिलांसाठी प्रसाधनगृहांची गरज आहे. ठाण्यासारख्या स्थानकावर दहा प्‍लॅटफॉर्मच्या आसपास महिलांकरिता प्रसाधनगृहे आहेत. या प्रसाधनगृहात कमी-जास्त प्रमाणात दुर्गंधी आणि अस्वच्छतेचे वातावरण आहे. स्थानकावरील प्रसाधनगृहालाही महिलांना पैसे मोजावे लागतात; पण ठाणेसारख्या स्थानकावर एकाही प्रसाधनगृहात हात धुण्यासाठी साबण किंवा हँडवॉश आणि महिलांची गरज असलेल्या सॅनिटरी पॅडची व्यवस्था नाही.
-------------------------------
कळवा, मुंब्रा आणि दिवा स्थानकावरही अस्वच्छता
रेल्वेस्थानकावरील प्रसाधनगृहे ही निविदा प्रक्रिया करून संस्थेला चालविण्यास देण्यात येत असल्याची रेल्वे सूत्रांची माहिती आहे. या प्रसाधनगृहात पुरेशा पाण्याची व्यवस्था, हात धुण्यासाठी हँडवॉश, साबण, महिलांसाठी सॅनिटरी पॅड यांसारख्या गोष्टीची सुविधा असणे महत्त्‍वाचे आहे. मात्र, या प्रकारच्या सुविधा ठाणे ते दिवा स्थानकापर्यंत कुठेच आढळत नाहीत. प्रसाधनगृहाची सफाई सुगंधी द्रव्याद्वारे करणे अपेक्षित आहे. मात्र, त्याचा वापर करण्यात येत नसल्याचे चित्र आहे. त्यामुळे प्रसाधनगृहात अस्वच्छता आढळते.
---------------------------------
प्रसाधनगृहात बऱ्याच ठिकाणी पाण्याची कमतरता
कळवा, मुंब्रा आणि दिवा स्थानकावरील प्रसाधनगृहांची दुरवस्था आहे. अनेक सुविधांचा अभाव जाणवतो; तर प्रसाधनगृहात पाण्याची व्यवस्था काही ठिकाणी नळाद्वारे करण्यात येते. मात्र काही ठिकाणी नळांना गळती लागली असून, काही ठिकाणी तुटलेले नळ आढळले असल्याने प्रसाधनगृहात पैसे दिल्यानंतरही दर्जेदार सुविधा मिळत नाहीत, अशा महिलांच्या तक्रारी आहेत.
-------------------------------------
हॅंडवॉश, साबण आणि सॅनिटरी पॅड गायब
ठाणे आणि दिव्यासारख्या जंक्शन असलेल्या रेल्वेस्थानकावर प्रवाशांना हात धुण्यासाठी साबण किंवा हँडवॉश आणि सॅनिटरी पॅड हे गायब झाल्याचे चित्र आहे. ठाणे ते दिवा स्थानकादरम्यान एकही प्रसाधनगृहात साबण, हँडवॉश किंवा सॅनिटरी पॅड आढळले नाहीत. याउलट प्रसाधनगृहात दुर्गंधीचा त्रास महिला प्रवाशांना होतो.
--------------------------------
ठाणे पश्चिमेकडे बाहेर पडताना स्थानकालगत प्रसाधनगृह आहे. त्याचा वापर महिला मोठ्या प्रमाणात करतात. या प्रसाधनगृहात हात धुण्यासाठी हँडवॉश उपलब्‍ध नसल्‍याने महिला प्रवाशांचे हाल होत आहेत.
- निकिता मोकल (प्रवासी ठाणे)

ठाणे स्थानकावर लोकल पकडण्यासाठी आलेल्‍या प्रवासी महिला रिक्षा स्टँडलगत असलेल्या प्रसाधनगृहाचा वापर करतात. मात्र, ठाणे स्थानकावर कुठल्याच प्रकारच्या दर्जेदार सुविधा आढळत नाहीत. साबण, हँडवॉश या सुविधाही मिळत नाहीत.
- ज्योती शिंदे (घोडबंदर, ठाणे)

कळवा स्थानकावर प्रसाधनगृहांची व्यवस्था नाही. कल्याणच्या दिशेला प्रसाधनगृह आहे; तर प्लॅटफॉर्म नं २ च्या लगत प्रसाधनगृहांची व्यवस्था आहे. पाण्याचा अभाव, अस्वच्छता आणि हँडवॉश, साबण आणि सॅनिटरी पॅड आदी सुविधा मिळताच नाहीत.
- विठाबाई सपकाळ (कळवा पूर्व)

मुंब्रा स्थानकावर तिकीट खिडकीपासून काही अंतरावरच प्रसाधनगृह आहे. मुंब्रा भागातील बहुतांश प्रवासी हे याच मार्गाने स्थानकावर येतात. येथे प्रसाधनगृहाचा वापर तुरळक होतो. कारण कधी-कधी पाण्याची कमतरता व सफाई होत नसल्‍याने महिला प्रवाशांना दुर्गंधीचा सामना करावा लागतो.
- फरीदा बेगम सय्यद (मुंब्रा तन्वर नगर)

दिवा स्थानकावर येण्यापूर्वीच प्रसाधनगृहांची व्यवस्था आहे. प्लॅटफॉर्म १ वरून कल्याणकडे जाणारे आणि प्लॅटफॉर्म २ वरून मुंबईकडे जाणारे महिला प्रवासी याच प्रसाधनगृहाचा वापर करतात. केवळ दोन प्रसाधनगृहांची व्यवस्था आहे.
- शुभांगी चौबे (दिवा पूर्व नोकरदार)
-----------------------------------------------
रेल्वेस्थानकावर असलेल्या महिला प्रसाधनगृहातून पैसे घेण्यात येतात. तरीही प्रसाधनगृहाची दुरवस्था आहे. रेल्वे निविदा प्रक्रियेद्वारे प्रसाधनगृह देते. रेल्वेद्वारे प्रवाशांना सुविधा म्हणून प्रसाधनगृह स्वच्छ व मोफत देणे गरजेचे आहे. तसेच अस्वच्छ प्रसाधनगृह, दुर्गंधी, साबण, हँडवॉश आणि सॅनिटरी पॅड आदी सुविधा नसल्याच्या महिलांच्या तक्रारी आहेत. मात्र, याची दखल कोणी घेत नाही.
- नंदकुमार देशमुख (अध्यक्ष, उपनगरीय रेल्वे प्रवासी महासंघ)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com