
अनुकंपा भरतीचा प्रश्न मार्गी
पालघर, ता. १२ (बातमीदार) : गुरुवारी (ता. ९) पालघर जिल्हा परिषद अध्यक्ष प्रकाश निकम यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेऊन चर्चा केल्याने २०१४ पासून प्रलंबित असलेला पालघर जिल्हा परिषदेच्या अनुकंपा उमेदवारांच्या भरतीचा प्रश्न मार्गी लागला असून शासनाकडून मिळालेल्या निर्देशामुळे अनुकंपा भरतीचा मार्ग सुकर झाला आहे.
जिल्हा परिषद अध्यक्ष प्रकाश निकम तसेच २०१४ पासूनचे जिल्हा परिषदेचे सर्व अध्यक्ष, उपाध्यक्ष, लोकप्रतिनिधी, मुख्य कार्यकारी अधिकारी, तसेच सध्याचे विद्यमान उपाध्यक्ष, सर्व समिती सभापती, उपमुख्य कार्यकारी अधिकारी संघरत्ना खिल्लारे यांच्या प्रयत्नाने अनुकंपा भरतीचा प्रश्न मार्गी लागला असून काही दिवसांत अनुकंपा उमेदवारांची भरती करण्यात येईल, अशी माहिती जिल्हा परिषदेमार्फत देण्यात आली आहे. भरती करण्याकरिता शासनाकडून जे मार्गदर्शन मागवले होते ते जिल्हा परिषद अध्यक्ष निकम यांनी प्राप्त करून शासनाकडे सादर करण्यात आले आहे. त्या अनुषंगाने शासनाने निर्देश दिल्याप्रमाणे भरतीबाबतची पुढील प्रक्रिया जिल्हा परिषदेतमार्फत सुरू करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले.
--------------------
गैरव्यवहार थांबण्यासाठी प्रयत्न
प्रकाश निमक यांनी आवाहन केल्याप्रमाणे कुठलाही गैरव्यवहार न होता पारदर्शकपणे ही भरती करण्यात येईल, असे सांगण्यात आले असले तरी पालघर जिल्ह्याची निर्मिती झाल्यानंतर अनुकंपा तत्त्वाखाली भरती झाली होती, त्यामध्ये काही अधिकाऱ्यांनी गैरप्रकार केले होते, हा गैरप्रकार उघडकीस येऊन या सर्व अधिकाऱ्यांना न्यायालयाने कोठडीत ठेवले होते; मात्र कोरोनाच्या काळात कारागृहात कैद्यांची गर्दी झाल्याने या अधिकाऱ्यांना अटी-शर्तीवर सोडण्यात आले होते. त्यातील काही अधिकारी पुन्हा पालघर जिल्हा परिषदेमध्ये आता कार्यरत आहेत. अनुकंपामधील बऱ्याच उमेदवारांची वये उलटून गेली आहेत. त्यामुळे भरतीमध्ये पुन्हा गैरप्रकार होण्याची शक्यता अनुकंपामधील उमेदवारांकडून व्यक्त केली जात आहे.