
गंजाड ग्रामपंचायत इमारतीचे लोकार्पण
कासा, ता. १२ (बातमीदार) : डहाणू तालुक्यातील गंजाड ग्रुप ग्रामपंचायतीतर्फे महिला दिनानिमित्त भव्य महिला मेळावा व ग्रामपंचायत इमारत लोकार्पण सोहळा पार पडला. सरपंच अभिजित देसक यांच्या अध्यक्षतेखालील तसेच पंचायत समिती सदस्या सविता धिंडे, उपसरपंच कौशल कामडी, सदस्य कैलास दळवी, विनोद गडग, सदस्य वनिता हाडळ, काशी वायेडा, मनीषा दळवी, निनिता गडग, अनिता कोठारी, अर्चना शालकर, ग्रामविकास अधिकारी किरण पाटील यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम पार पडला. या कार्यक्रमामध्ये गंजाड ग्रामपंचायत हद्दीतील जिल्हा परिषद शाळेतील सर्व महिला शिक्षिका, अंगणवाडी सेविका, मदतनीस, आशा वर्कर्स, महिला बचत गटातील अध्यक्षा, सचिव, सदस्या, कर्मचारी वर्ग व गावातील जवळपास ३०० महिला उपस्थित होत्या. या वेळी मनोरंजनासाठी आदिवासी परंपरागत नृत्य धुमशा, जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थिनीचे नृत्य, वक्तृत्व व गीतांसोबत रांगोळी स्पर्धा, लिंबू-चमचा व संगीत खुर्ची अशा स्पर्धा आयोजित करण्यात आल्या होत्या. विजेत्यांना ग्रामपंचायतीकडून सन्मानचिन्ह देण्यात आले.