
मिरा-भाईंदर महापालिकेचा आज अर्थसंकल्प
भाईंदर, ता. १२ (बातमीदार) : मिरा-भाईंदर महापालिकेचा आगामी आर्थिक वर्षासाठीचा अर्थसंकल्प उद्या (ता. १३) प्रशासक म्हणून आयुक्त दिलीप ढोले सादर करणार आहेत. सध्या प्रशासकीय राजवट सुरू असल्याने महापालिकेच्या इतिहासात प्रशासकाने अर्थसंकल्प सादर करण्याची ही दुसरी वेळ आहे. या अर्थसंकल्पात नागरिकांवर करवाढ लादली जाणार का, याबाबत सगळ्यांमध्ये उत्सुकता लागून राहिली आहे.
२००२ मध्ये मिरा-भाईंदर महापालिकेची स्थापना झाल्यानंतर पहिली सार्वत्रिक निवडणूक होण्याआधी फेब्रुवारी ते ऑगस्ट हा प्रशासकीय काळ होता. त्यामुळे प्रशासक म्हणून तत्कालीन आयुक्तांनी महापालिकेचा पहिला अर्थसंकल्प सादर केला होता. मात्र सध्याच्या परिस्थितीत थोडा फरक आहे. कोरोना काळापासून राज्यात महापालिकांच्या निवडणुका झालेल्या नाहीत. मिरा-भाईंदर महापालिकेची मुदत गेल्या वर्षी ऑगस्ट महिन्यात संपुष्टात आली. त्यानंतर आयुक्त दिलीप ढोले हे प्रशासक म्हणून महापालिकेचा कारभार सांभाळत आहेत. त्यालाही लवकरच सहा महिने पूर्ण होणार आहेत.
महासभा अस्तित्वात नसल्याने हाच अर्थसंकल्प अंतिम असणार आहे. प्रशासन त्याची अंमलबजावणी करणार आहे. महापालिकेची आर्थिक स्थिती नाजूक बनली असल्यामुळे उत्पन्न वाढीसाठी कोणत्या उपाययोजना करायच्या यासाठी अतिरिक्त आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली एका समितीची नियुक्ती आयुक्तांनी केली होती. या समितीने मालमत्ता करासह महापालिका लावत असलेले विविध कर, तसेच परवाना शुल्क यात वाढ करण्याची शिफारस केली होती. ही शिफारस स्वीकारून आयुक्तांनी करात वाढ केली आहे का, हे आता उद्याचा अर्थसंकल्प सादर झाल्यानंतर स्पष्ट होणार आहे; परंतु यावर्षी महापालिकेची निवडणूक होण्याची शक्यता असल्याने मालमत्ता करात कोणतीही वाढ होणार नाही, असे राजकीय निरीक्षकांचे म्हणणे आहे.
--------------------------
महासभेकडून वाढ
गेल्या वर्षी महापालिका आयुक्तांनी १८१७ कोटी रुपयांचा अर्थसंकल्प स्थायी समितीपुढे सादर केला होता. त्यात आधी स्थायी समितीने व नंतर महासभेने वाढ केल्यामुळे अर्थसंकल्प चारशे कोटी रुपयांनी फुगून तो २२२७ कोटी रुपयांवर गेला होता. मात्र महापालिकेच्या सध्याच्या उत्पन्नाच्या आकडेवारीवर नजर टाकली तर आयुक्तांनी गेल्या वर्षी सादर केलेल्या मूळ अर्थसंकल्पातील उत्पन्नाच्या आकडेवारीशीच ही आकडेवारी जुळत असल्याचे दिसून येत आहे.