
वसईत पहिले सीएनजी स्टेशन सुरू
विरार, ता. १२ (बातमीदार) : पालघर जिल्ह्यासह वसई तालुक्यात मोठ्या प्रमाणात सीएनजी वाहने आहेत. सीएनजी वाहनधारकांसाठी आता आनंदाची बातमी असून वसई तालुक्यात आता प्रथमच स्वतंत्र सीएनजी पंपाचे उद्घाटन वसईचे आमदार हितेंद्र ठाकूर यांच्या हस्ते पार पडले. या वेळी नालासोपाराचे आमदार क्षितिज ठाकूर, बोईसरचे आमदार राजेश पाटील, माजी खासदार बळीराम जाधव, ठाणे जिल्हा बँकेचे राजन पाटील तसेच ज्येष्ठ बविआ नेते नारायण मानकर आदी मान्यवर उपस्थित होते. वसई तालुक्याच्या पूर्व पट्टीतील पारोळ गाव परिसरामध्ये हा स्वतंत्र सीएनजी पंप वसईकरांसाठी कार्यरत करण्यात आला.
विशेष म्हणजे वसई तालुक्यातील हा सीएनजी पंप तालुक्यातीलच नव्हे; तर सबंध पालघर जिल्ह्यातला पहिला सीएनजी पंप आहे. या पंपावर आठ नोझल असल्यामुळे कुठल्याही प्रकारच्या वाहनांची गर्दी होणार नाही. यासाठी कंपनीने पार्किंगची खास व्यवस्थाही केलेली आहे. या ठिकाणी स्वतंत्र सीएनजी गॅसचे आठ नोझल आणि चार डिस्पेन्सर आहेत. जवळपास पार्किंगसाठी दोन प्लॉटदेखील स्वतंत्र व अतिरिक्त व्यवस्था म्हणून घेण्यात आलेले आहेत. सध्या सर्वत्र पेट्रोल व डिझेलचे भाव गगनाला भिडले असताना बऱ्यापैकी नागरिक आता सीएनजी वाहनांकडे वळत आहेत; मात्र आजवर वसईकरांना वसई पूर्व, मुंबई-अहमदाबाद महामार्ग, घोडबंदर किंवा थेट काशीमिरा, मिरा-भाईंदर येथे जावे लागत होते. त्या ठिकाणी प्रचंड मोठ्या प्रमाणावर वाहनांची गर्दी होत असल्याने त्याचा फटका वाहनधारकाला बसत होता. नवीन सीएनजी गॅस पंपामुळे आता त्यांची गर्दीतून सुटका होणार आहे.