
पनवेल गुन्हे वार्ता
बँक खात्यातून ८५ हजार लंपास
नवीन पनवेल (वार्ताहर) : एका व्यक्तीच्या बँक खात्यातून ८५ हजार रोख रक्कम लंपास झाल्याची घटना खारघरमध्ये घडली आहे. खारघरमध्ये राहणाऱ्या मनू सिंग यांच्या मोबाइलवर केवायसी अपडेट करण्याचा संदेश आला. या संदेशामध्ये दिलेल्या लिंकवर क्लिक केल्यानंतर त्यावरील फॉर्म भरून आलेला ओटीपी समोरून बोलणाऱ्या व्यक्तीला सांगितला. यानंतर काही वेळेत त्यांच्या मुलाच्या बँक खात्यामधून ८५ हजार ५११ रुपये काढण्यात आले. या ऑनलाइन फसवणूकप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे.
१२ म्हशींसह तीन रेडकांची सुटका
नवीन पनवेल (वार्ताहर) : एका टेम्पोमधून १२ म्हशींसह तीन रेडक्यांची वाहतूक करणाऱ्यांवर खारघर पोलिसांनी कारवाई केली आहे. सायन-पनवेल महामार्गावरून टेम्पोमधून १२ म्हशी व तीन रेडके दाटीवाटीने भरून घेऊन जात असल्याची माहिती नागरिकांनी नियंत्रण कक्षाला दिली. त्यानुसार पोलिसांच्या पथकाने टेम्पो ताब्यात घेऊन पाहणी केली. संबंधित टेम्पोचालकाकडे वैद्यकीय प्रमाणपत्र आढळले नाही आणि जनावरांची योग्य काळजी घेतली नव्हती. त्यामुळे खारघर पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
लाखो रुपयांच्या कंटेनरची चोरी
नवीन पनवेल (वार्ताहर) : चार लाख रुपये किमतीच्या कंटेनरची चोरी झाल्याची घटना पनवेल तालुक्यातील कसळखंड येथे घडली आहे. विठ्ठल कोळपे यांचा पांढऱ्या रंगाचा ४० फुटी कंटेनर नवकार सी.एफ.एस. कंपनीच्या गेटसमोरील रस्त्यावर उभा होता. हा कंटेनर चोरट्याने नेल्याने याबाबतची तक्रार पनवेल तालुका पोलिस ठाण्यात करण्यात आली आहे.
खाद्यपदार्थ विक्रेत्यावर गुन्हा दाखल
नवीन पनवेल (वार्ताहर) : अवैधपणे खाद्यपदार्थ विक्री करणाऱ्या फेरीवाल्यांवर गुन्हा दाखल केल्याची घटना तळोजा पोलिस ठाणे हद्दीत घडली आहे. तळोज्यामधील खुटारी गावाजवळ रस्त्यावर अवैधपणे खाद्यपदार्थ तयार करून विकणाऱ्या दोन फेरीवाल्यांवर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. गॅस शेगडीचा वापर करून सार्वजनिक सुरक्षेला धोका निर्माण केल्याचा ठपका त्यांच्यावर ठेवला आहे. तळोज्यासह पोलिस आयुक्तालय क्षेत्रात विविध ठिकाणी अशा प्रकारची कारवाई सुरू केली आहे.
खांदेश्वर स्थानकाबाहेर दुचाकीची चोरी
नवीन पनवेल (वार्ताहर) : खांदेश्वर रेल्वे स्थानकाबाहेर पार्किंगला लावलेली दुचाकी अज्ञात व्यक्तीने चोरून नेल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी खांदेश्वर पोलिस ठाण्यात चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. करंजाडे येथे राहणारा तरुण राजेंद्र परिहार याचे मोबाइलचे दुकान आहे. वडाळा येथे जाण्यासाठी दुचाकीने तो खांदेश्वर स्थानकावर आला होता. त्याने रेल्वे स्थानकाबाहेर दुचाकी उभी करून ठेवली होती; मात्र परतल्यानंतर गाडी दिसली नाही. त्यामुळे त्याने दुचाकी चोरीची तक्रार खांदेश्वर पोलिस ठाण्यामध्ये दाखल केली आहे.
मारहाण करून चालकाची लूट
नवीन पनवेल (वार्ताहर) : लघुशंकेसाठी थांबलेल्या टेम्पो चालकाला तीन अज्ञात व्यक्तींनी मारहाण करून त्याच्याकडील मोबाइल व १० हजार रुपये घेऊन पलायन केल्याची घटना कळंबोली परिसरात घडली आहे. रामचंद्र मोटे हे पुण्याला जात असताना त्यांनी कळंबोली येथे टेम्पो बाजूला लावून लघुशंकेसाठी उतरले होते. या वेळी तीन अज्ञात व्यक्तींनी मारहाण करून त्याच्याकडील मोबाइल व १० हजार रुपये घेऊन पलायन केले. या घटनेमुळे घाबरलेला मोटे याची प्रकृती बिघडली. प्रकृती सुधारल्यानंतर त्यांनी याविषयी पोलिस ठाण्यात तक्रार दिली.