
विक्रमगडमध्ये १०८ हेक्टर क्षेत्र बांधीत
विक्रमगड, ता. १२ (बातमीदार) : विक्रमगड तालुक्यात ४ ते ७ मार्चदरम्यान झालेल्या अवकाळी पावसामुळे तालुक्यातील ५१ गावांतील १०८ हेक्टर जमिनीमधील पिकांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. यामध्ये आंबा, काजू, इतर फळझाडे तसेच भाजीपाला, कडधान्ये यांचा समावेश असुन पंचनाम्याच्या कामास सुरुवात झाली आहे.
तालुक्यातील शेतकऱ्यांची तसेच रब्बी पिके शेतकऱ्यांनी सुरुवात केली आहे. असे असताना अचानक अवकाळी पाऊस सुरू झाल्याने शेतकऱ्यांची तारांबळ उडाली. तसेच वीटभट्टी मालकांची दाणादाण उडाली. आंबा बगायतदारांचेही यामध्ये मोठे नुकसान झाले आहे. जोरदार पावसाच्या माऱ्याने लहान आकाराचे आंबे गळून पडले आहेत. नुकसानीचे प्रत्यक्ष पंचनामे काम ग्राम पातळीवर ग्रामसेवक, कृषी अधिकारी तसेच तलाठी यांच्यामार्फत सुरू असुन तालुका स्तरावर तहसीलदार, गट विकास अधिकारी तसेच तालुका कृषी अधिकारी यांच्यामार्फत पंचनाम्याचा अहवाल येत्या आठ दिवसांत जिल्हा स्तरावर सादर होणार आहे.
------------------------
मागील आठवड्यात तीन दिवस सतत पाऊस झाल्याने आंबा पिकाचे मोठे नुकसान झाले आहे. या वर्षी आधीच उशिराने मोहर आला. सुपारी आकाराचे आंबे झाले असताना तीन दिवस पाऊस झाल्याने आंबा पिकाचे मोठे नुकसान झाले आहे. या वर्षी बदलते वातावरण व अवकाळी पाऊस यामुळे २० ते ३० टक्केही आंबा पीक हाती येणार नाही. पीक विमा कंपनी व शासनाने दखल घेऊन आंबा पिकाची नुकसान भरपाई द्यावी.
- बबन दामोदर सांबरे, आंबा उत्पादक शेतकरी, ओंदे