
जव्हारमध्ये एक दिवस महिलांसाठी उपक्रम
जव्हार, ता. ११ (बातमीदार) : जागतिक महिला दिनाचे औचित्य साधत अजंता ॲग्रो मल्टिस्टेट को-ऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड यांच्या विद्यमाने शहरातील साई महल येथे पालघर लोकसभेचे खासदार राजेंद्र गावित यांच्या उपस्थितीत जव्हार तालुक्यातील ५०० महिलांचा सन्मान करून महिला परिषद व आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाला राज्य चर्मकार नियोजन समितीचे महाराष्ट्र सदस्य कॅप्टन विनीत मुकणे यांनीदेखील हजेरी लावून महिलांना शुभेच्छा देत मार्गदर्शन केले. या वेळी पोलिस निरीक्षक सुधीर संखे उपस्थित होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी अजित घोसाळकर होते. या वेळी लक्ष्मण कोकणे, डॉ. राजीव श्रीवास्तव, ॲड. कल्याणी मुकणे, महिला आयोग सदस्य ज्योती भोये, माजी नगरसेविका रश्मीन मणियार यांनी महिलांना मार्गदर्शन केले. या वेळी डॉक्टर, पोलिस, इंजिनियर, वकील, आशा वर्कर, अंगणवाडी सेविका, खेळाडू, नर्स, सफाई कामगार, वनरक्षक, राजकीय महिला, सामाजिक कार्यकर्त्या आदी विविध क्षेत्रांतील महिलांचा सन्मान करण्यात आला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन भावना पवार यांनी केले.