
तोलानी महाविद्यालयाकडून महिलांना स्वसंरक्षणाचे धडे
जोगेश्वरी, ता. १२ (बातमीदार) ः जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून अंधेरी पूर्वच्या तोलानी महाविद्यालयात मुलींना मोफत स्वरंक्षणाचे धडे देण्यात आले. मेघवाडी पोलिसांच्या सहकार्याने आजूबाजूच्या परिसरातील महिला आणि मुलींसाठी स्वसंरक्षण कार्यशाळा आयोजित केली होती. महिला सबलीकरणासाठी अशा प्रकारच्या कार्यशाळांची सध्या फार गरज आहे. अशा प्रशिक्षणातून मिळालेल्या मार्गदर्शनामुळे संकटकाळी महिलांना स्वत:चे संरक्षण करता येऊ शकते, अशी माहिती महाविद्यालयाच्या ज्युडो प्रशिक्षक जसप्रीत कपूर यांनी दिली. कार्यशाळेचे प्रशिक्षक डॉ. निसार हुसेन व त्यांच्या सहकाऱ्यांनी प्रात्यक्षिके दाखवून विद्यार्थिनींना स्वरक्षणाचे धडे दिले. या वेळी शंकरवाडी मराठी शाळा, श्रमिक विद्यालय, बाल विकास, हरी नगर क्र. २, गुरू नानक इंग्लिश हायस्कूल आणि इन्फंट जिझस हायस्कूल मधील ३१ मुलींनी आणि तोलानी कॉलेज ऑफ कॉमर्सच्या ७२ मुलींनी यात सहभाग घेतला. या वेळी मेघवाडीचे वरिष्ठ पोलिस निरिक्षक राजेद्र पांढरे उपस्थित होते. ही कार्यशाळा डॉ. निसार हुसेन यांच्या मार्गदर्शनाखाली आणि पात्र स्वसंरक्षण आणि ज्युदो प्रशिक्षक जसप्रीत कपूर, किरण यादव आणि नयना यादव यांच्या मार्गदर्शनाखाली झाली.