
ठाणे-पालघर अंतर घटणार
खर्डी, ता. १२ (बातमीदार) : खर्डी-टेंभा-वैतरणा-परळी-उज्जेनी-झाप या राज्यमार्ग असून यामुळे ठाणे व पालघर जिल्हा रेल्वे मार्गाशी जोडून जवळ येणार आहे. या राज्य मार्गासाठी अर्थसंकल्पीय अधिवेशनात अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी १५ कोटी रुपये मंजूर केले असून यासाठी आमदार दौलत दरोडा यांनी पाठपुरावा केला होता. या राज्य मार्गामुळे परळीला जाण्यासाठी खर्डी-वाडा-परळी हा ६० किलोमीटरचा वळसा वाचणार असून ४० किलोमीटर अंतर कमी होऊन खर्डी-वैतरणा-परळी हे अंतर २० किलोमीटर होणार आहे. या रस्त्यामुळे परळी व येथील ८ ग्रामपंचायतीच्या नागरिकांचा थेट खर्डी रेल्वे स्थानकाशी संपर्क होणार असल्याने येथील नागरिक मुंबईच्या संपर्कात येणार आहेत.
मोडकसागर धरण (वैतरणा) ते परळी गाव या रस्त्याला मोडकसागर धरणाखालील बाजूस पूल नसल्याने येथील रहिवाशांना खर्डीवरून रेल्वेने मुंबईला जाण्यासाठी ६० किलोमीटरचा वळसा घालून रोज ये-जा करावी लागत आहे. हा ठाणे जिल्ह्यातील शहापूर तसेच पालघर जिल्ह्यातील वाडा व जव्हार तालुक्यातून हा रस्ता जातो. वाड्यातील सुशिक्षित बेरोजगार नोकरीसाठी, स्थानिक आदिवासी ग्रामस्थ, शेतकऱ्यांना आपला शेतीचा माल विक्रीसाठी खर्डी रेल्वे स्थानकात घेऊन येण्यासाठी सोपे होणार आहे. शिवाय खर्डी, शहापूर या बाजारपेठेशीदेखील हे ग्रामस्थ जोडले जाणार आहेत. वैतरणा (मोडकसागर) धरणाखाली पुलाचे बांधकाम झाल्यास सार्वजनिक वाहतूक, एसटी महामंडळाची बस सेवादेखील सुरू होऊ शकते. एकंदरीत परळी-वैतरणा हा रस्ता येथील नागरिकांना वरदानच ठरणार असून रोजगार निर्मितीही होऊन बेरोजगार तरुणांना संधी मिळेल.
---------------
वाड्यातील आठ ग्रामपंचायती लोहमार्गाला जोडणार
परळी ते वैतरणा (मोडकसागर) या रस्त्याचे खडीकरण व डांबरीकरण अशा पद्धतीने काम झाले असून वाडा तालुक्यातील परळी ते वैतरणा हा डांबरीकरण रस्ता; तर शहापूर तालुक्यातील खर्डी ते वैतरणा हादेखील डांबरीकरण रस्ता अस्तित्वात असल्याने वाडा तालुक्यातील ओगदे, परळी, मांडवा, वरसाळे, मागरुळ, उज्जेनी, गारगाव, आखाडा या आठ ग्रामपंचायती स्वातंत्र्यानंतर प्रथमच कल्याण-कसारा या लोहमार्गाला जोडल्या जाणार आहेत.
---------------------
परळी-वैतरणा रस्त्यामुळे परिसरातील आठ ग्रामपंचायती खर्डी लोहमार्गाशी जोडल्या जाणार आहेत. यामुळे येथील विद्यार्थ्यांना पुढचे शिक्षण घेणे, बेरोजगारांना रोजगारासाठी शहराकडे जाणे सुलभ होणार आहे. मोडकसागर धरणाखाली पूल मंजुरीचे काम अंतिम टप्प्यात आहे.
- रोहिणी शेलार, सभापती, बालकल्याण समिती, जिल्हा परिषद पालघर.
--------------------
मोडकसागर धरणाखाली वैतरणा नदीवर रस्ता नसल्याने दुचाकीस्वार नदीमधून वाट शोधत धडपडत ये-जा करत असतात. या पुलासाठी १५ कोटी मंजूर झाले असून, या ठिकाणी लवकरच पूल होणार असून हा पूल खर्डी व परळी यांना जोडणारा दुवा ठरणार आहे.
- दौलत दरोडा, आमदार