
वयोमर्यादा उलटलेल्यांसाठी लिंक खुली करण्याची मागणी
सकाळ वृत्तसेवा
ठाणे, ता. १२ : कोरोना आपत्तीच्या काळात एमपीएससीची परीक्षा न झाल्यामुळे वयोमर्यादा उलटलेल्या तरुण-तरुणींना गट ब आणि गट क परीक्षेचे अर्ज करण्यासाठी लिंक खुली करावी, अशी मागणी भाजपचे आमदार निरंजन डावखरे यांनी विधान परिषदेत औचित्याच्या मुद्द्याद्वारे केली. राज्य लोकसेवा आयोगाने (एमपीएससी) गट ब व गट कमधील पदांसाठी आठ हजार १७५ पदांची जाहिरात प्रसिद्ध केली. या पदांसाठी ३० एप्रिल रोजी पूर्वपरीक्षा होणार आहे. या परीक्षेसाठी २१ फेब्रुवारीपर्यंत फॉर्म स्वीकारण्यात आले होते; मात्र या परीक्षेसाठी तांत्रिक कारणांमुळे वयोमर्यादा उलटलेल्या शेकडो तरुण-तरुणींना अर्ज सादर करता आलेले नाहीत. याकडे आमदार निरंजन डावखरे यांनी सभागृहाचे लक्ष वेधले. कोरोना आपत्तीच्या काळात परीक्षा न झाल्यामुळे वयोमर्यादा उलटलेल्या विद्यार्थ्यांसाठी राज्य सरकारची भूमिका सकारात्मक आहे. राज्याच्या शासन निर्णयानुसार १ मार्च २०२० ते १७ डिसेंबर २०२१ दरम्यान वय अधिक ठरणाऱ्या उमेदवारांना ३१ डिसेंबर २०२२ पर्यंत प्रकाशित होणाऱ्या जाहिरातीत संधी देण्यात येणार आहे, परंतु शासन निर्णयातील तांत्रिक चुकीमुळे १७ डिसेंबर २०२१ नंतर वय ओलांडणारे विद्यार्थी अपात्र ठरले आहेत. तरी या उमेदवारांवर अन्याय न होता, त्यांना गट व गट क परीक्षेत संधी मिळावी, यासाठी संबंधित परीक्षेसाठी अर्ज भरण्याची लिंक दोन दिवसांसाठी खुली करावी, अशी मागणी आमदार निरंजन डावखरे यांनी औचित्याच्या मुद्द्याद्वारे केली.