
आदिवासी पाड्यांवरील सुविधांसाठी संयुक्त बैठक
मुंबई, ता. १२ ः बोरिवलीच्या संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातील आदिवासी पाड्यांना मूलभूत सोयीसुविधा देण्यासाठी वनविभाग आणि आदिवासी विकास विभागाची संयुक्त बैठक घ्यावी, या भाजपचे विधान परिषदेतील गटनेते प्रवीण दरेकर यांच्या मागणीला आदिवासी विकास खात्याचे मंत्री डॉ. विजयकुमार गावित यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला आहे.
संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातील आदिवासी पाडे अजूनही सुविधांपासून वंचित आहेत, त्यामुळे त्यांना न्याय द्यावा, अशी मागणी दरेकर यांनी विधान परिषदेत प्रश्नोत्तराच्या तासाच्या वेळी केली. विधान परिषदेत भाजप आमदार प्रसाद लाड यांनी फलाटपाड्यातील आदिवासींसाठी रस्ते, पाणी यासंदर्भात प्रश्न उपस्थित केला होता. त्या प्रश्नावरील चर्चेत सहभागी होताना दरेकर यांनी संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातील आदिवासी पाड्यांची गैरसोय दाखवून दिली. नॅशनल पार्कमध्ये १६ आदिवासी पाडे आहेत. त्यांना आजही पाणी, वीज यासह कुठल्याही प्रकारच्या मूलभूत सुविधा नाहीत. मात्र शेजारच्या बंगल्यांना वीज, पाणी या सर्व सुविधा मिळतात. त्यामुळे वनखाते आणि आदिवासी विभागाची तात्काळ संयुक्त बैठक घेऊन आदिवासी नागरिकांना न्याय द्यावा, अशी मागणी दरेकर यांनी केली.