
मिरा-भाईंदरमध्ये हिंदू जनआक्रोश मोर्चा
भाईंदर, ता. १२ (बातमीदार): लव्ह जिहादविरोधात कडक कायदा बनवण्यात यावा, या मागणीसाठी मिरा-भाईंदर येथे हिंदू जनआक्रोश मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते. भाईंदर पूर्व येथील गोल्डन नेस्ट सर्कल येथून हा मोर्चा काढण्यात आला. त्यानंतर मिरा रोड येथील एस. के. स्टोन परिसरात त्याचे जाहीर सभेत रूपांतर झाले. काजल दीदी हिंदुस्तानी यांनी या सभेला मार्गदर्शन केले.
लव्ह जिहाद हा गंभीर धोका असून याद्वारे देशात हिंदू समाजाविरोधात छुपा अजेंडा राबविण्यात येत असल्याचा आरोप काजल हिंदुस्तानी यांनी यावेळी केला. जनआक्रोश मोर्चामध्ये भाजपचे आमदार नितेश राणे, आमदार गीता जैन, माजी आमदार नरेंद्र मेहता, भाजपचे जिल्हाध्यक्ष ॲड. रवी व्यास यांच्यासह विविध हिंदुत्ववादी संघटना मोठ्या संख्येने सहभागी झाल्या होत्या. लव्ह जिहादसह, लँड जिहाद, गोवंश हत्या, धर्मांतरण आदी मुद्द्यांचाही यात समावेश करण्यात आला होता. जाहीर सभेनंतर जिल्हाधिकारी व पोलिस आयुक्त यांना एक निवेदन देण्यात आले.