
आदिवासी महिलांना औषधी वनस्पतींबद्दल मार्गदर्शन
वज्रेश्वरी, ता. १२ (बातमीदार) : जागतिक महिला दिनाचे औचित्य साधत प्रसाद चिकित्साद्वारे अभिनव प्रकारे महिला दिन साजरा करण्यात आला. येथील तानसा खोऱ्यातील आदिवासी महिलांना औषधी वनस्पतींचा व्यापार व संवर्धन करण्यासाठी मार्गदर्शन सत्राचे आयोजन करण्यात आले. तसेच उत्पादक महिलांची व्यापाऱ्यांसोबत बैठकही घडवून आणली. या वेळी कळंभई, कोशीमशेत, गायगोठा या गावातील २८ बचत गटांतील दोनशे महिला उपस्थित होत्या. महिलांना जंगलावर आधारित शाश्वत उपजीविकेचे साधन उपलब्ध करून देण्यासाठी गणेशपूरी येथील प्रसाद चिकित्सा या धर्मदाय संस्थेने २८ बचत गटातील महिलांना एकत्र करीत ३०० महिलांचे तानसा खोरे वनधन विकास केंद्र स्थापन केले आहे. या केंद्राअंतर्गत आदिवासी महिलांनी गोळा केलेल्या गौण वन उपजावर प्राथमिक प्रक्रिया करून विक्री करणे हा मुख्य उद्द्येश आहे. या वेळी पुणे येथील वेलकेअर नॅचरलचे संचालक किरण अभ्यंकर उपस्थित होते.