
भिवंडीत तृणधान्य पाककला स्पर्धेत जल्लोष
भिवंडी, ता. १२ (बातमीदार) : भिवंडी-निजामपूर शहर महानगरपालिकेचे प्रशासक तथा आयुक्त विजयकुमार म्हसाळ यांच्या आदेशानुसार महिला दिन उत्साहात साजरा करण्यात आला. महानगरपालिकेच्या स्व. गाजेंगी सांस्कृतिक मंगल कार्यालय, कोंबडपाडा येथे आयोजित केलेल्या जागतिक महिला दिनानिमित्त विविध स्पर्धांमध्ये महिलांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून हा दिवस उत्साहपूर्ण वातावरणात व जल्लोषांमध्ये साजरा करण्यात आला. या वेळी प्रमुख अतिथी म्हणून वैदेही विजयकुमार म्हसाळ, नीलिमा ओमप्रकाश दिवटे आणि श्वेता दीपक झिंजाड उपस्थित होत्या. या वेळी आयोजित केलेल्या तृणधान्य पाककला स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.
जागतिक महिला दिनानिमित्त भिवंडी महापालिकेच्या समाज विकास विभागातर्फे महिलांसाठी विविध कला, सांस्कृतिक कार्यक्रम व स्पर्धाचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी पुण्याचे योगतज्ज्ञ, रेकी अँड मास्टर व अध्यक्ष-स्ट्रेस रिलिज फाऊंडेशनचे प्रसिद्ध व्याख्याते अशोक देशमुख यांचे हसत खेळत तणावमुक्ती या विषयावरील व्याख्यान उपस्थित महिलांमध्ये एक नवीन ऊर्जा निर्माण करणारे ठरले. याप्रसंगी विभा विठ्ठल कासारे यांनी लकी ड्रॉ जिंकून पैठणीच्या मानकरी ठरल्या. आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्षाचे औचित्य साधून पालिकेमार्फत पौष्टिक तृणधान्य पाककला स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये महिलांसह अनेक पुरुष मंडळींनीही सहभाग घेतला होता. याप्रसंगी महानगरपालिकेच्या शिक्षण उपायुक्त प्रणाली घोंगे, सहायक नगररचनाकार स्मिता कलगुटी, वैद्यकीय अधिकारी डॉ. बुशरा सय्यद, शहरातील व महानगरपालिकेतील महिला अधिकारी, कर्मचारी वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मानसी राजे यांनी; तर प्रास्ताविक प्रणाली घोंगे यांनी केले.