
जिल्ह्यात परीक्षेचा हंगाम सुरू
अलिबाग, ता. १२ (बातमीदार) : रायगड जिल्ह्यामध्ये फेब्रुवारीपासून बारावी व मार्चपासून दहावीच्या परीक्षा सुरू झाल्या आहेत. आता अन्य परीक्षाही सुरू होणार आहेत. यासाठी ग्रामीणसह शहरी भागातील विद्यार्थी परीक्षेची तयारी जोरात करत आहेत. ठिकठिकाणी विद्यार्थी अभ्यासात मग्न आहेत. पालकही त्यांच्याकडून अभ्यास करून घेत आहेत. जिल्हा परिषद व वकिली क्षेत्रातील परीक्षाही मार्च महिन्याच्या शेवटच्या आठवड्यापासून सुरू होणार आहेत. त्यामुळे एप्रिल महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यापर्यंत परीक्षांचा हंगाम सुरू राहणार आहे.
दहावी व बारावीचे वर्ष महत्त्वाचे मानले जाते. या परीक्षेत विद्यार्थ्यांना चांगले गुण मिळावे, यासाठी वेगवेगळ्या शाळांमधील शिक्षक व पालक प्रचंड मेहनत घेतात. ज्यादा क्लासेस घेऊन विद्यार्थ्यांना बारावी परीक्षेला सामोरे जाण्यासाठी सक्षम बनवण्याचा प्रयत्न केला जातो. विद्यार्थीही वर्षभर भरपूर अभ्यास करतात. जिल्ह्यात २१ फेब्रुवारीपासून सुरू झालेली बारावीची परीक्षा २१ मार्चपर्यंत सुरू राहणार आहे. दहावीची परीक्षा २ मार्चपासून सुरू झाली असून, २५ मार्चपर्यंत असणार आहे. दहावी व बारावीच्या विद्यार्थी अभ्यासात मग्न असताना आता महिन्याच्या शेवटच्या आठवड्यापासून पहिली ते नववीच्या विद्यार्थ्यांची परीक्षा सुरू होणार आहे. रायगड जिल्ह्यात पहिली ते आठवीच्या तीन हजार नऊ शाळा आहेत. या शाळांमध्ये दोन लाख चार हजार २७७ विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. एप्रिलच्या दुसऱ्या आठवड्यापर्यंत या शाळांमधील विद्यार्थ्यांची परीक्षा होणार आहेत. त्या परीक्षांची तयारीही जोरात सुरू आहे. विद्यार्थ्यांकडून अभ्यास करून घेण्यापासून त्यांना परीक्षेत चांगले मार्क कसे मिळतील, याचे प्रयत्न शिक्षकांकडून होत आहे. मार्चच्या शेवटच्या आठवड्यापासून एलएलबीचीही परीक्षा सुरू होणार आहे.
------------------
जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांची लेखी परीक्षा मार्च महिन्याच्या शेवटच्या आठवड्यापासून सुरू होणार आहे. एप्रिल महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यापर्यंत या परीक्षांची शक्यता आहे. एप्रिल अखेर परीक्षांचा निकाल जाहीर केला जाईल. परीक्षा शांततेत व सुरळीत पार पाडण्यासाठी शिक्षक प्रचंड मेहनत घेत आहेत. विद्यार्थीही अभ्यास करत आहेत.
- पुनीता गुरव, शिक्षणाधिकारी, प्राथमिक विभाग
रायगड जिल्हा परिषद