
गोखले पुलाचे उर्वरित गर्डर आज काढणार
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. १२ : अंधेरी रेल्वे स्थानकादरम्यान असलेल्या गोखले उड्डाणपुलाचे पाडकाम ७५ टक्के पूर्ण झाले आहे. शनिवार-रविवारच्या रात्रकालीन मेगाब्लॉकमध्ये १६ गर्डरपैकी बारा गर्डर हटवण्यात आले आहेत. उर्वरित चार गर्डर रविवार-सोमवार मध्यरात्री काढण्यात येणार असल्याची माहिती पश्चिम रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी सुमित ठाकूर यांनी दिली आहे.
गोखले पूल १९७५ मध्ये बांधण्यात आला होता. २०१९ मध्ये सीएसएमटी येथील हिमालय पुलाच्या दुर्घटनेनंतर मुंबईतील सर्वच पुलांचे स्ट्रक्चरल ऑडिट करण्यात आले. यात सल्लागाराने गोखले पुलाच्या दुरुस्तीचा सल्ला दिला होता. त्यानुसार पालिकेने आपल्या हद्दीतील पुलाचे काम सुरू केले; मात्र रेल्वे हद्दीतील गोखले उड्डाणपूल धोकादायक असल्याने तो पाडून नवा बांधण्याचा निर्णय पालिकेने घेतला होता. त्यानुसार पूल पाडण्यासाठी ३० तासांच्या रात्रकालीन मेगाब्लॉकचे नियोजन पश्चिम रेल्वेने केले आहे. त्यानंतर जानेवारीपासून या पुलांचे पाडकाम रेल्वेने सुरू केले. आता पुलावरील शेवटचे गर्डर हटवण्यासाठी पश्चिम रेल्वेने पाचवी मार्गिका आणि फलाट क्रमांक ९ वरील रेल्वे मार्गिकांवर शनिवारी रात्री ९ ते रविवारी पहाटे ५.३० वाजेपर्यंत आठ तासांचा विशेष ब्लॉक घेतला होता. या ब्लॉकदरम्यान फक्त पश्चिम रेल्वेला १६ पैकी १२ गर्डर हटवण्यात यश आले. उर्वरित गर्डर सोमवारी रात्री हटवण्यात येणार आहेत. त्यानंतर पालिका प्रशासन या पुलांची पुनर्बांधणी करणार असल्याची माहिती पश्चिम रेल्वेने दिली आहे.