
१५ वर्षे झालेल्या वाहनांची होणार नोंदणी
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. १२ : केंद्रीय रस्ते वाहतूक महामार्ग मंत्रालयाच्या आदेशानुसार राज्य सरकारने वाहन स्क्रॅप पॉलिसीची अंमलबजावणी राज्यात सुरू केली आहे. १५ वर्ष आणि त्यापेक्षा जास्त कालमर्यादा झालेल्या सरकारी वाहनांची मेटल स्क्रॅप ट्रेड कॉर्पोरेशन (एमएसटीसी) वर नोंदणी करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. जिल्हास्तरावर २० मार्चपूर्वीच सरकारी कार्यालयांनी नोंदणी पूर्ण करण्याच्या सूचना जिल्हाधिकाऱ्यांनी दिल्या आहेत, तर परिवहन आयुक्त कार्यालयाने राज्यातील आरटीओ अधिकाऱ्यांना सूचना दिल्या आहेत.
केंद्राने नुकतेच वाहन स्क्रॅपिंग सुविधेची नोंदणी आणि कार्य नियमावली २०२१ च्या अनुषंगाने राज्यातील शासकीय, निमशासकीय, स्थानिक स्वराज्य संस्था व सार्वजनिक परिवहन उपक्रमातील वाहने स्क्रॅप करण्याच्या सूचना दिल्या. त्यापूर्वी अशा वाहनांची माहिती गोळा करण्याच्या दृष्टीने वाहनांची नोंदणीसुद्धा केली जाणार आहे. त्यानुसार सरकारने अशा सर्व वाहनांची माहिती मेटल स्क्रॅप ट्रेड कॉर्पोरेशनच्या सांकेतिक स्थळावर अपलोड करून त्या वाहनांची माहिती वाहन ४.० प्रणालीवर अद्ययावत करायची आहे. त्यासाठी उप प्रादेशिक परिवहन अधिकारी यांची समन्वयक अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. विविध विभागांच्या निष्कासित होणाऱ्या वाहनांची माहिती या पोर्टलवर अपलोड करण्याकरिता इतर सर्व शासकीय विभागांशी समन्वय साधून २० मार्चपूर्वीच माहिती अद्ययावत करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. स्क्रॅप पॉलिसी अंमलबजावणी करण्याच्या दृष्टीने प्रत्येक परिवहन कार्यालयाने उप प्रादेशिक परिवहन अधिकारी यांच्या अध्यतेखाली एक समिती गठीत करण्याचे आदेशही देण्यात आले आहेत.