
म्हसळ्यात एक्स-रे विभाग बंद
श्रीवर्धन, ता. १३ (बातमीदार) : म्हसळा येथील सरकारी ग्रामीण रुग्णालयात तपासणीसाठी येणाऱ्या रुग्णांचे योग्य निदान व्हावे, यासाठी एक्स-रे मशीन उपलब्ध करून देण्यात आली आहे. मात्र, एक्स-रे मशीन हाताळणारे टेक्निशियन नसल्यामुळे एक्स-रे विभाग बंद पडला आहे. परिणामी रुग्णांना या सुविधेपासून वंचित राहावे लागत असल्याचा प्रकार समोर आले आहे. याशिवाय जास्त वीजपुरवठ्यामुळे मशीन खराब होत असल्याचे रुग्णालयातील प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे.
म्हसळा येथील ग्रामीण रुग्णालयात रुग्णांचे अचूक निदान करण्यासाठी डिजिटल कॉम्प्युटराइज एक्स-रे मशीन आहे. परंतु येथील ही सुविधा काही महिन्यांपासून टेक्निशियनअभावी बंद पडली आहे. त्यामुळे रुग्णांना केवळ एक्स-रेसाठी खासगी रुग्णालयात जाण्याची वेळ आली आहे. पर्यायी गरीब रुग्णांना आर्थिक झळही सहन करावी लागत आहे. या रुग्णालयात दररोज मोठ्या प्रमाणात रुग्ण उपचारासाठी येतात. त्यातील विविध आजारांमध्ये रुग्णांचे निदान करण्यासाठी एक्स-रे काढावे लागतात. यामध्ये काही रस्ते अपघातांचेही रुग्णही असतात. अशा रुग्णांना तर एक्स-रे काढणे अती आवश्यक असते. तेवढ्यासाठी या रुग्णांना खासगी रुग्णालयाचा रस्ता धरावा लागतो. मात्र, सुविधा उपलब्ध असूनही ती रुग्णांच्या कामी येत नसेल, तर ती सुविधा कोणत्या कामाची? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. वरिष्ठ अधिकाऱ्यांसह रुग्णालय प्रशासनाने यावर तत्काळ उपाययोजना करून ही गैरसोय दूर करण्याची मागणी रुग्णांमधून होत आहे.
जास्त व्होल्टेजमुळे मशीन खराब
एक्सरे मशीन बंद असल्याबद्दल रुग्णालयात विचारले असता, एक्सरे तंत्रज्ञ उपलब्ध होतील; मात्र मूळ समस्या ही जास्त व्होल्टेजची आहे. उच्च विद्युत दाबामुळे यापूर्वी एक्स-रे आणि इतर महत्त्वांच्या मशीन बंद पडल्या, असे रुग्णालयातील कर्मचाऱ्यांचे मत आहे. यापूर्वी दोनदा शॉर्टसर्किटच्या घटनाही घडल्या आहेत. यासाठी महावितरण विभागाला पत्रव्यवहारही करण्यात आला आहे. तेथील अभियंत्यांनी लवकरात लवकर पाहणी करावी, अशी मागणी रुग्णालय व रुग्णांकडून करण्यात येत आहे.
म्हसळा ग्रामीण रुग्णालयातील विद्युत उपकरण आणि वाहिन्यांची पाहणी सुरू केली आहे. रुग्णालयातील विद्युतीकरणमध्ये किंवा वाहिन्यांमध्ये काही दुरुस्ती असल्यास तशा सूचना दिल्या जातील. जेणेकरून मशीन सुरू होवून रुग्णांची गैरसोय दूर होईल.
- आर. ए. झांबरे, प्रभारी उपअभियंता, महावितरण, म्हसळा