विरार-फुलपाड्यातील वाहतूककोंडी सोडवा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

विरार-फुलपाड्यातील वाहतूककोंडी सोडवा
विरार-फुलपाड्यातील वाहतूककोंडी सोडवा

विरार-फुलपाड्यातील वाहतूककोंडी सोडवा

sakal_logo
By

विरार, ता. १३ (बातमीदार) : विरार पूर्व परिसरातील कोपरी नाका, साईनाथ नगर, जीवदानी पायथा, पाच पायरी तसेच जीवदानी चौक (साईबाबा मंदिर) बाझार वॉर्ड परिसरात दररोज होणारी वाहतूककोंडी डोकेदुखी ठरली आहे. या वाहतूक कोंडीमुळे नागरिक व विद्यार्थी हैराण होत असल्याने या कोंडीवर कायमस्वरूपी तोडगा काढण्यात यावा, या मागणीने जोर धरला आहे. या मागणीकरिता माजी स्थायी समिती सभापती तथा शिवसेना (बाळासाहेब ठाकरे) तालुकाप्रमुख सुदेश चौधरी यांनी नुकतीच पालिका आयुक्त अनिलकुमार पवार यांची भेट घेतली. या भेटीत विरार-फुलपाडा व अन्य ठिकाणच्या समस्या चौधरी यांनी आयुक्तांच्या निदर्शनास आणून दिल्या आहेत.

मागील काही वर्षांत विरार पूर्व भागात वाहतूककोंडीची समस्या मोठ्या प्रमाणात वाढलेली आहे. त्यामुळे विद्यार्थी, ज्येष्ठ नागरिक तसेच नोकरदार, व्यावसायिकांना निश्चित वेळात कामावर पोहचता येत नाही. विरार पश्चिम येथील मधुबन हॉटेल ते बंजारा हॉटेलपर्यंत दुभाजक टाकण्यात यावेत. मलांज मैदानात दररोज मोठा बाजार भरत असल्याने या बाजारात येणारे नागरिक दुचाकी व चारचाकी वाहने रस्त्यावरच उभी करत असल्याने या परिसरात रहदारीला अडथळा येतो. त्यामुळे या ठिकाणी दुभाजक बनवल्यास या परिसरातील वाहतूक कोंडीची समस्या कमी होईल. तसेच रस्त्यात उभ्या करून ठेवण्यात येणाऱ्या वाहनांमुळे असलेली अपघातांची शक्यताही कमी होईल. त्यामुळे बांधकाम विभागाला या रस्त्यावर पाहणी करून दुभाजक उभारण्याच्या सूचना कराव्यात, अशी मागणीही सुदेश चौधरी यांनी केली आहे. वारंवार वाहतूककोंडी होत असल्याने परिसरातील रहिवाशांचे जीवनही असह्य झालेले आहे. त्यात या रस्त्यांवर भरत असलेले बाजार, अनधिकृत फेरीवाले तसेच अनेक ठिकाणी रस्त्यावर असलेले अडथळे दूर करणे गरजेचे असल्याचे मत या भेटीत चौधरी यांनी आयुक्तांजवळ व्यक्त केले आहे.