पालिकेच्या परिवहनमध्येही महिलांना सूट द्या

पालिकेच्या परिवहनमध्येही महिलांना सूट द्या

विरार, ता. १३ (बातमीदार) : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जाहीर केलेल्या अर्थसंकल्पात महिलांना एसटी प्रवासात ५० टक्के सूट देण्याची घोषणा केली आहे. या पार्श्वभूमीवर वसईचे माजी आमदार डॉमनिक घोन्साल्विस यांनीही राज्य शासनाप्रमाणे महानगरपालिकेने आपल्या परिवहन सेवेत महिलांना ५० टक्के सूट देण्याची मागणी आयुक्त आणि परिवहन समिती सभापती यांच्याकडे केली आहे.
राज्यशासनाच्या अर्थसंकल्पात महिलांना एसटी प्रवासात ५० टक्के सूट देण्याची घोषणा केल्यावर त्याचे पडसात वसईमध्येही उमटले असून वसई-विरार महानगरपालिकेच्या परिवहन सेवेतही महिला प्रवाशांना प्रवासात ५० टक्के सूट देण्याची मागणी वसईचे आमदार डॉमनिक घोन्साल्विस यांनी आयुक्त अनिलकुमार पवार आणि परिवहन समिती सभापती भरत गुप्तता यांच्याकडे केली आहे. वसई-विरार महानगरपालिकेच्या परिवहन सेवेच्या बसमध्ये आता अनेक सुविधा प्रवाशांना देण्यात येत आहेत. यात अपंग, कॅन्सर रुग्ण, डायलेसीसचे रुग्ण, ज्येष्ठ नागरिक यांना प्रवासात १०० टक्के सूट देण्यात येत आहे. त्यामुळे आता महिलांना ५० टक्के सूट दिल्यास ती भरून कशी काढणार हा प्रश्नही प्रशासनापुढे असणार आहे. सध्या परिवहनचा अर्थसंकल्प मंजुरीच्या प्रतीक्षेत आहे. त्याचप्रमाणे पालिकेचा अर्थसंकल्पही मंजुरीच्या प्रतीक्षेत असल्याने माजी आमदार डॉमनिक घोन्साल्विस यांनी केलेल्या मागणीची दखल पालिका आयुक्त आणि परिवहन समिती सभापती घेतात का? याकडे लक्ष लागून राहिले आहे.

===========
माजी आमदार डॉमनिक घोन्साल्विस यांनी महिलांना परिवहनच्या बसमधून प्रवासात ५० टक्के सूट देण्याची मागणी केली आहे. शासन ज्या सुविधा देत नाही अशा सुविधा पालिकेच्या परिवहन समितीमार्फत आम्ही देत आहोत. माजी आमदारांच्या सूचनेचा आम्ही विचार करू. याबाबत आयुक्त तथा प्रशासक यांच्याबरोबर यावर चर्चा करण्यात येईल.
- भरत गुप्ता, परिवहन समिती सभापती

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com