स्वच्छतेसाठी आयुक्तांची झाडाझडती | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

स्वच्छतेसाठी आयुक्तांची झाडाझडती
स्वच्छतेसाठी आयुक्तांची झाडाझडती

स्वच्छतेसाठी आयुक्तांची झाडाझडती

sakal_logo
By

सकाळ वृत्तसेवा
नवी मुंबई, ता. १३ ः महापालिका आयुक्त राजेश नार्वेकर यांनी विभागांमध्ये जाऊन केलेल्या स्वच्छता पाहणीमुळे क्षेत्रीय पातळीवर आठवडाभरात स्वच्छतेविषयी अधिक सकारात्मक चित्र दिसू लागले आहे. या पाहणी दौऱ्यात आयुक्तांनी अधिकारी, कर्मचारी, तसेच कंत्राटदारांना फैलावर घेतले. त्यामुळे काही भागांमध्ये त्याचा सकारात्मक परिणाम दिसू लागला आहे.
स्वच्छ सर्वेक्षणात देशात पहिल्या क्रमांकावर येण्याचा निर्धार नवी मुंबई महापालिकेचे आयुक्त राजेश नार्वेकर यांनी केला आहे. याच अनुषंगाने विविध भागांमध्ये विभागनिहाय दौरे केले जात आहेत. या माध्यमातून अधिकारी, कंत्राटदार, तसेच कर्मचाऱ्यांमध्ये समन्वय साधण्याचा प्रयत्न केला जात आहे. याच अनुषंगाने नुकतीच राजेश नार्वेकर यांनी बेलापूर विभागाची पाहणी केली होती. या पाहणीदरम्यान गणपतशेठ तांडेल मैदानाच्या कॉर्नरला मातीचे ढिगारे दिसून आल्याने आयुक्तांनी संबंधित अधिकाऱ्यांना फैलावर घेत डेब्रिज भरारी पथके अधिक कृतिशील करण्याचे निर्देश दिले आहेत. तसेच नवी मुंबईत विशिष्ट स्थळांवर मॉर्निंग वॉकला येणाऱ्या नागरिकांचे प्रमाण अधिक असून अशा मार्गांची सफाई अधिक लवकर सुरू करावी, असेही आयुक्तांनी निर्देशित केले. तसेच दिवाळे गाव येथील मासळी मार्केटची, तसेच फिशफेड प्रकल्पाची पाहणी केल्यानंतर त्याची व्याप्ती वाढवण्याच्या दृष्टीने आवश्यक कार्यवाही करण्याचे निर्देश दिले. तसेच दिवाळे गाव जेट्टी, तसेच त्या परिसरातील शौचालयांचीही पाहणी करून तेथील स्वच्छता चांगल्या प्रकारे राखण्याबाबतच्या सूचना आयुक्तांनी केल्या.
------------------------------------------------
आयुक्तांनी नोंदवलेली निरीक्षणे ः
- बेलापूर व नेरूळ भागात मुख्य रस्त्यांवर पाहणी करताना बऱ्याच ठिकाणी रस्त्यांवरून कल्व्हर्टमध्ये पावसाळी पाणी वाहून जाण्यासाठी रस्ते व पदपथाच्या कॉर्नरवर ठेवलेल्या वर्तुळाकार जागेवरील जाळ्यांवर माती जमा झाल्याने पाणी वाहून जाण्यास होणारा अडथळा लक्षात घेऊन ते मार्ग साफ करावेत.
- या पाहणी दौऱ्यात आयुक्तांनी सीवूड रेल्वे ब्रीज, सेक्टर ४०, ४२, करावे, गणपतशेठ तांडेल मैदान, ज्वेल ऑफ नवी मुंबई, झोटींगदेव मैदान, सेक्टर ४४, पामबीच मार्ग, दिवाळे गाव, सेक्टर ११, सेक्टर १५, कोकण भवन व आसपासचा शासकीय कार्यालय परिसर, आर्टिस्ट व्हिलेज, रमाबाई आंबेडकर नगर, सेक्टर १४ अशा विविध ठिकाणी भेटी देत प्रत्यक्ष पाहणी केली.