चारोटी उड्डाणपुलाखाली वाहतूककोंडी पाचवीलाच पूजलेली | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

चारोटी उड्डाणपुलाखाली वाहतूककोंडी पाचवीलाच पूजलेली
चारोटी उड्डाणपुलाखाली वाहतूककोंडी पाचवीलाच पूजलेली

चारोटी उड्डाणपुलाखाली वाहतूककोंडी पाचवीलाच पूजलेली

sakal_logo
By

कासा, ता. १३ (बातमीदार) : मुंबई-अहमदाबाद मार्गावर चारोटी उड्डाणपुलाखालून नाशिक-डहाणू राज्य महामार्ग गेला आहे. त्यामुळे नेहमी या रस्त्यावर मोठी राहदारी असते. पुलाखालील अरुंद बोगदा असल्याने मोठाले कंटेनर येथून जात असताना अडकून बसतात. या उड्डाणपुलाखाली महामार्ग प्रशासनाने काही सूचना, सिग्नल, लाईट लावण्याची मागणी नागरिक तसेच वाहनचालकांकडून होत आहे.
चारोटी उड्डाणपुलाखालून डहाणू-मुंबईकडे जाणाऱ्या, नाशिककडे जाणाऱ्या तसेच नाशिक-जव्हारवरून डहाणूकडे जाणाऱ्या वाहनांची संख्या सकाळ संध्याकाळच्या वेळी अधिक असते. त्यामुळे अनेक तास वाहतूक कोंडी होते. सकाळ-संध्याकाळच्या वेळी प्रवासी वाहने या रस्त्यावरून जात असतात. सध्या डहाणू, वाणगाव भागात रेल्वे रुंदीकरण, ब्रिज बांधणे, बुलेट ट्रेन, बडोदरा एक्स्प्रेस ही कामे सुरू असल्याने त्याचप्रमाणे वाढवण बंदराच्या कामाची पाहणी करण्यासाठी जाणाऱ्या अनेक वाहनांमुळे त्याचबरोबर अदाणी कंपनीच्या दररोजच्या शेकडो वाहनांमुळे येथे वाहतूक कोंडी होत आहे.

----------------
यात्रेपूर्वी उपाययोजना करण्याची मागणी
येथे सध्या मोठी वाहतूक कोंडी होत असून काही दिवसांपूर्वी एशियन पेट्रोल पंपासमोरील क्रॉसिंग बंद केल्याने पेट्रोल, डिझेल, सीएनजी भरण्यासाठी वाहने याच पुलाखालून जात आहेत. त्यामुळे गर्दी वाढत आहे. त्यात काही दिवसांनी महालक्ष्मीची यात्रा भरणार आहे. त्यात चारोटीजवळील सेवा रस्त्याचे काम कासवगतीने सुरू आहे. यात्रेनिमित्त वाहनाची मोठी गर्दी होणार आहे. त्या वेळी या उड्डाणपुलाखाली मोठी कोंडी होऊन अपघाताचे प्रमाण वाढणार आहे. यासाठी उपाययोजना करावी, अशी मागणी वाहन चालक करीत आहेत.