वार्तापत्र | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

वार्तापत्र
वार्तापत्र

वार्तापत्र

sakal_logo
By

चिरेबंदी वाडा शोधतोय विकासाची दिशा

वाडा : दिलीप पाटील

वाडा हे पालघर जिल्ह्यातील केंद्रीय स्थान असून त्याला भौगोलिक दृष्टीनेही महत्त्व आहे. वाड्यात विविध प्रश्नांवर अनेक प्रकल्प राबविले जातात. पोकळ घोषणाही होतात; परंतु तालुक्यात विकासाची योग्य दिशा मात्र अजून मिळालेली नाही. कृषी उत्पन्न बाजार समिती, तालुका क्रीडा संकुल, आरोग्य सुविधा, दळणवळणाच्या बाबतीत तालुका पिछाडीवर पडला आहे. प्रत्येक प्रश्नावर गांभीर्याने विचार होऊन फक्त वरवरची मलमपट्टी न करता अभ्यासपूर्ण व ठोस निर्णय घेऊन गतिमान आणि पारदर्शक सुविधा देण्याचा विचार झाला; तर तालुक्याच्या विकासाला निश्चितच योग्य दिशा मिळू शकेल.

वाडा तालुक्याची लोकसंख्या एक लाख ७५ हजारांच्या आसपास आहे. तालुक्याचे एकूण क्षेत्रफळ ७६ हजार ३४२ चौरस किलोमीटर आहे. तालुक्यात भाताचे प्रमुख पीक असून भाताच्या पिकाखाली १४ हजार ५०० हेक्टर क्षेत्र आहे. एकूण १६८ खेडी व १५० हून अधिक पाडे असलेल्या वाड्यात ८४ ग्रामपंचायती आहेत. वाड्याला पूर्वी भाताचे कोठार म्हणून संबोधले जायचे. वाडा कोलम हा भाताचे वाण राज्यभर प्रसिद्ध आहे. मुंबईच्या बाजारपेठेत त्याला चांगली मागणी आहे; मात्र निर्सगाच्या लहरीपणामुळे कधी ओला दुष्काळ; तर कधी कोरडा दुष्काळ हे असे प्रत्येक वर्षी होत गेल्याने येथील शेतकऱ्यांनी शेती करणे सोडून दिले आहे.

वाड्यासारख्या अतिमागास भागाचा विकास व्हावा व गरीब आदिवासींना रोजगार मिळावा या उद्देशाने शासनाने सन १९९२ मध्ये डी प्लस झोन ही योजना जाहीर करण्यात आली. या योजनेत उद्योजकांना १३ वर्षे विक्री करात सूट, ३० टक्के रोख अनुदान, वीज शुल्कात १० ते १२ टक्के सवलती देण्यात आल्या होत्या. त्यामुळे प्लास्टिक पिशव्या ते कपड्यापर्यंत, टाचणीपासून भांड्यापर्यंत, मोटारगाड्या, विमानाचे भाग अशा किंमती वस्तूंचे उत्पादन करणारे कारखाने आले; मात्र कारखानदारांना सरकारने रस्ता, पाणी व वीज अशा मूलभूत सुविधा उपलब्ध करून न दिल्याने अनेक कारखाने बंद झाले आहेत.

कारखान्यामुळे तालुक्याच्या सर्वच कानाकोपऱ्यात अवजड वाहतूक सुरू झाली; मात्र अवजड वाहनांचा विचार न करता रस्ते बनवल्याने ते लगेच खराब होऊन खड्ड्यात जात होते. त्यामुळे कारखानदार मेटाकुटीला आले होते. एवढ्या प्रदीर्घ वर्षांच्या कालावधीनंतर आता मात्र एक एक रस्ता काँक्रीटीकरण होत असल्याने उद्योजकांसह स्थानिक नागरिकांत समाधानाचे वातावरण आहे. तसेच या तालुक्यातून भिवंडी-वाडा-मनोर हा मुख्य रस्ता गेला असून या रस्त्याचे चौपदरीकरणाचे काम गेल्या दहा वर्षापूर्वी हाती घेण्यात आले आहे. रस्त्याचे काम आतापर्यंत पूर्ण होऊ शकलेले नाही. अद्यापही ३० टक्के काम अर्पूण आहे.

तालुक्यात वैतरणा, तानसा, पिंजाळ, गारगावी व देहजे या नद्या तालुक्यातून जात आहेत; मात्र नियोजनाअभावी पाणी राहत नाही. परिणामी पाणी टंचाईचा सामना करावा लागतो. या तालुक्यातील शेतकऱ्यांचा आर्थिक विकास करावयाचा असेल तर सर्व नद्यांवर पाच किलोमीटर अंतरावर गळती न होणारे बंधारे बांधले पाहिजेत. सध्या या तालुक्याची कागदावरच असलेली कृषी उत्पन्न बाजार समितीची रचना करून या समितीच्या माध्यमाने सर्व कृषी उत्पन्नांची खरेदीचे काम झाले पाहिजे. वाडा येथे आरोग्याबाबत हेळसांड असून गेल्या ५० वर्षापूर्वीचे ३० खाटांचे ग्रामीण रुग्णालय आहे ते आजही तसेच आहे. त्यात काहीही बदल झाला नाही. वाढत्या लोकसंख्येचा विचार करून उपजिल्हा रुग्णालय मंजूर झाले आहे मात्र जागेअभावी ते होऊ शकलेले नाही.

तालुक्यात विजयपूर (कोने) येथे जिल्हा क्रीडा विभागाच्या नावे १६ एकर १४ गुंठे एवढे क्षेत्र असलेला भूखंड क्रीडांगण व मनोरंजनासाठी अनेक वर्षांपासून राखीव आहे. मात्र याच्या विकासाबाबत इच्छाशक्तीचा अभाव असल्याने तो धूळ खात पडला आहे. येथील तरुणांच्या क्रीडा व कलागुणांना वाव द्यायचा असेल, तर क्रीडा संकुल होणे गरजेचे आहे.