
घरफोडी, दुचाकी लंपास करणारी टोळी गजाआड
अलिबाग, ता. १३ (बातमीदार) : रायगड जिल्ह्यामध्ये वाढत्या दुचाकी चोरीच्या घटनांबरोबरच घरफोडीवर अंकुश ठेवण्यासाठी रायगडच्या पोलिस दलाने मोहीम हाती घेतली आहे. स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने दुचाकी चोरी आणि घरफोडीच्या ११ गुन्ह्यांमधील सहा जणांच्या टोळीला गजाआड केले आहे. त्यांच्याकडून तीन लाख ११ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
रायगड जिल्ह्यामध्ये औद्योगिकीकरण झपाट्याने वाढत आहे. त्यामुळे नागरिकीकरणही वाढत आहे. जिल्ह्यात चारचाकी, वाहनांसह दुचाकी खरेदी करण्याचा क्रेझ वाढत आहे. दरवर्षाला सुमारे २५ हजारांपेक्षा अधिक दुचाकी खरेदी केल्या जात आहेत. आज प्रत्येकाच्या घरासमोर दुचाकी उभी असल्याचे चित्र आहे. मात्र, दुचाकी चोरीसह घरफोडीसारख्या घटनाही वाढत आहेत. रायगड जिल्ह्यात घरफोडी, दुचाकीचोरी करणाऱ्या चोरट्यांना पकडण्यासाठी रायगडच्या स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने वेगवेगळ्या माध्यमातून त्यांचा शोध सुरू केला. पोलिस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पथक तयार करण्यात आले. पोलिस उपनिरीक्षक विकास चव्हाण, महेश कदम, पोलिस हवालदार शामराव कराडे, प्रतीक सावंत, राकेश म्हात्रे, महिला पोलिस हवालदार अभियंती मोकल, पोलिस नाईक विशाल आवळे, अनिल मोरे, पोलिस शिपाई मोरेश्वर ओमले, सायबर सेलचे पोलिस नाईक तुषार घरत आणि अक्षय पाटील यांच्या पथकाने गोपनीय माहितीनुसार माहिती घेण्यास सुरुवात केली. त्यामध्ये विलास मोतीलाल हरजीवन (१९, रा. पारगाव खंडाळा, सातारा), अनिल अंकुश काळे (१९), सागर गौतम (२०), मोबीन अतीअल्ला खान (२०), सनी लहू पवार (२०, रा. कात्रज बोगदा कचरा डेपो, पुणे), राजू मोहन चव्हाण उर्फ आप्पा रा. सिन्नर झोपडपट्टी नाशिक रोड या सहा जणांना ताब्यात घेतले. त्यांची कसून चौकशी केल्यानंतर त्यांनी माणगाव, गोरेगाव, पोलादपूर, महाड शहर, व कोलाड पोलिस ठाण्याच्या हद्दीत ११ गुन्ह्यांची कबुली दिली. या आरोपींकडून गुन्ह्यांत चोरी झालेले ३ लाख ११ हजार ९०० रुपयांचे सोन्याचे दागिने; तसेच चोरी केलेले दोन मोबाईल, दोन दुचाकी जप्त केल्या आहेत.