अग्निसुरक्षा वाऱ्यावर | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

अग्निसुरक्षा वाऱ्यावर
अग्निसुरक्षा वाऱ्यावर

अग्निसुरक्षा वाऱ्यावर

sakal_logo
By

जुईनगर, ता. १३ (बातमीदार) : स्वच्छतेसह इतर अनेक मानांकने मिळवणाऱ्या नवी मुंबई महापालिकेच्या अग्निशमन दलाला मात्र ग्रहण लागले आहे. नवी मुंबई महापालिका कार्यक्षेत्रात अग्निशमन सेवा पुरवणाऱ्या दलात कार्यरत असणाऱ्या सुमारे २०० जवानांपैकी २३ जणांकडे आगीवर नियंत्रण व आपत्ती व्यवस्थापनाबाबत असलेल्या प्रशिक्षणाची प्रमाणपत्रेच नाहीत, अशी माहिती सुषमा मौर्य यांनी माहिती अधिकारात मिळवली आहे.
महाराष्ट्रात सर्व महापालिका, एमआयडीसी, सिडको व खासगी व्यवस्थापनामध्ये अग्निशामक पदावर नियुक्ती करताना राज्य अग्निशमन प्रशिक्षण केंद्रामार्फत चालवले जाणारे प्रशिक्षण घेणे अनिवार्य आहे. हे प्रशिक्षण असल्याशिवाय नियुक्ती करता येत नाही. आवाज फाउंडेशनच्या अध्यक्षा सुषमा मौर्य यांनी माहिती अधिकारात मिळवलेल्या माहितीवरून नवी मुंबई महापालिकेच्या अग्निशमन दलातील सुमारे २३ कर्मचारी कोणतेही अधिकृत प्रशिक्षण न घेता बोगस प्रमाणपत्राच्या आधारे पालिकेत कार्यरत आहेत. याच कर्मचार्‍यांपैकी एक अग्निशामक जवान यांना पालिकेने पुढील पदोन्नतीसाठी प्रशिक्षणासाठी पाठवले आहे. महापालिकेत रुजू होण्यापूर्वी जड वाहन चालवण्याचा परवाना नसतानाही आणखी एका जवानाला सेवेत रुजू करून त्यांनाही पुढील पदोन्नतीसाठी पालिकेने सुमारे पाच लाख खर्च करून प्रशिक्षण दिले आहे. आजमितीस नवी मुंबईच्या करदात्यांची अग्निसुरक्षा महापालिकेने वेशीवर टांगली आहे. नियमानुसार अधिकृत प्रमाणपत्र नसलेले २३ अग्निशामक जवान आहेत.
या सर्व अग्निशमन जवानांवर १५ दिवसांत कारवाई न झाल्यास अग्निशमन दल व नवी मुंबई महापालिकेविरोधात उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल केली जाईल, अशी माहिती मौर्य यांनी नेरूळ येथे झालेल्या पत्रकार परिषदेत दिली. यापूर्वी पालिकेने दोनपेक्षा अधिक अपत्ये असलेल्या दोन जवानांना बडतर्फ केले होते. त्यामुळे आता २३ कर्मचाऱ्यांबाबत पालिका काय निर्णय घेणार, याकडे लक्ष लागले आहे.

नवी मुंबई पालिकेच्या अग्निशमन दलामध्ये २००७ मध्ये भरती झाली होती. त्या वेळी त्यांच्या कागदपत्रांची पडताळणी करून त्यांना सेवेत रुजू करण्यात आले. काही अग्निशामक जवानांची कागदपत्रे बोगस असल्याच्या तक्रारी आलेल्या आहेत. त्यामुळे पुन्हा एकदा त्यांची कागदपत्रे पडताळणी केली जाईल. ती योग्य असल्यास ते सेवेत रुजू राहतील आणि दोषी आढळल्यास सेवेतून निलंबित करण्यात येईल.
- नितीन नार्वेकर, उपायुक्त, नवी मुंबई पालिका

नवी मुंबई अग्निशमन दलातील ज्यांच्याकडे बोगस प्रमाणपत्रे आहेत, त्यांच्यावर कारवाई करावी. या संदर्भात पालिका आयुक्तांना ३ सप्टेंबर रोजी पत्र पाठवले होते. ज्यांच्याकडे बोगस कागदपत्रे आहेत, त्यांना प्रमोशन दिले जाते. बोगस कागदपत्रे असणाऱ्यांवर कारवाई करावी.
- सुषमा मौर्या, अध्यक्षा, आवाज फाऊंडेशन