
डोंबिवलीत ‘महाराष्ट्रीय भारतरत्न’ कार्यक्रम उत्साहात
डोंबिवली, ता. १३ (बातमीदार) : डोंबिवली ग्रंथसंग्रहालयाचा ३४ वा वर्धापनदिन साजरा करण्यात आला. या वेळी अक्षत क्रिएशन प्रस्तुत ‘महाराष्ट्रीय भारतरत्न’ या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाची संकल्पना, लेखन, दिग्दर्शन आणि सहभाग सुप्रसिद्ध वृत्तनिवेदक आणि निवेदक अमेय रानडे यांचा होता. ज्या भारतरत्नांची जन्मभूमी वा कर्मभूमी महाराष्ट्र आहे अशा निवडक नऊ भारतरत्नांचे कर्तृत्व, त्यांचे महाराष्ट्राच्या आणि भारताच्या विकासातील योगदान आणि त्यांचा कार्यपट अभिवाचन तसेच काही व्हिडीओंच्या माध्यमातून उलगडून दाखवला. यात डॉ. बाबासाहेब आंबेडकर, लता मंगेशकर, पं. भीमसेन जोशी, सचिन तेंडुलकर अशा नऊ भारतरत्नांचा समावेश आहे. या कार्यक्रमतील सहभागी कलाकार तपस्या नेवे, आकाश भडसावळे आणि अमेय रानडे यांनी दीड तासांच्या कार्यक्रमातून रंजकपणे सादरीकरण केले. याप्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून ज्येष्ठ अभिनेत्री पद्मश्री नयना आपटे उपस्थित होत्या. या वेळी ग्रंथसंग्रहालयाचे सुभाष मुंदडा, विष्णू सोमण, सतीश कुलकर्णी आदी पदाधिकारी उपस्थित होते.