
राड्याचा पाड्याची पाणीटंचाई कायमची दूर
खर्डी, ता. १३ (बातमीदार) : कसारा गाव हद्दीतील राड्याचा पाडा वस्तीतील पाणीटंचाई कायमची दूर करण्यासाठी लार्सन टुब्रो, मुंबई कंपनीच्या सीएसआर फंडातून प्रयास तरंग संस्थेने ११ लाख ८० हजार रुपयांचा निधी उपलब्ध करून देखण्या विहिरीचे बांधकाम केले. यासाठी भाजपचे विनायक सावंत यांनी केलेल्या प्रयत्नांना यश मिळाल्याने ग्रामस्थांनी संस्थेचे पदाधिकारी आणि कंपनीच्या अधिकाऱ्यांचे आभार मानले आहेत.
कसारा-मोखावणे ग्रामपंचायती अंतर्गत येणाऱ्या राड्याचा पाडा येथील लोकसंख्या अंदाजे ४५० आहे, पण येथे दरवर्षी जानेवारी महिन्यापासूनच तीव्र पाणीटंचाई जाणवत होती. येथील रहिवासी डबक्यातील पाणी जमा करण्यासाठी वणवण भटकत होते. जलस्रोत नसल्याने राड्याचा पाडा येथील ग्रामस्थांना दरवर्षी पाणीटंचाईचा सामना करावा लागत होता. या अडचणीची दखल घेत कसारा भाजप शहराध्यक्ष विनायक सावंत यांनी येथील पाणीटंचाई दूर करण्यासाठी, पाड्यातच विहीर बांधण्याचा संकल्प केला होता; परंतु जागेची अडचण लक्षात येताच गावातील सखाराम खडके, काशिनाथ खडके या दोन्ही भावांनी विहिरींसाठी जमीन दान केली. विनायक सावंत यांनी मुंबई येथील प्रयास तरंग (पवई) या संस्थेच्या माध्यमातून विहिरीचे खोदकाम व बांधकाम करण्यासाठी लार्सन टुब्रो कंपनीच्या सीएसआर फंडातून निधी उपलब्ध करून विहिरीचे बांधकाम पूर्ण केले.
जवळपास १० मीटर खोली असलेल्या विहिरीमध्ये १७ फूट उंचीवर पाण्याचे पाझर येत असल्याने राड्याचा पाडा वस्तीतील लोकांचा पाणीप्रश्न कायमचा मार्गी लागला. पिण्याच्या पाण्यासाठी विहीर खुली होताच पुष्पवृष्टी, फटाके आणि ढोल-ताशांची आतषबाजी करून प्रयास तरंग संस्थेच्या पदाधिकाऱ्यांचे जल्लोषात स्वागत करण्यात आले.