रस्त्यावर धावतात नादुरुस्त बस

रस्त्यावर धावतात नादुरुस्त बस

कल्याण, ता. १३ (बातमीदार) : स्मार्ट सिटी शहरात समावेश असलेल्या कल्याण-डोंबिवली शहरातील केडीएमटी बसेस वेळेवर दुरुस्त न केल्याने नादुरुस्त बस रस्त्यावर आणल्या जात आहेत. अशा बसमधून प्रवाशांना जीवघेणा प्रवास करावा लागत असून मागील तीन महिन्यात दोन केडीएमटी कर्मचारी जखमी झाल्याने कर्मचारी वर्गात संतापाचे वातावरण आहे.
केडीएमटीच्या ताप्यात १४१ बस असून केवळ ९० बस रस्त्यावर काढण्यात केडीएमटी प्रशासनाला यश आले आहे. निधीअभावी नादुरुस्त बस डेपोमध्ये सडत आहे. अनेक एसी बसमधील प्रवासी दरवाजे खराब असून अनेक बसमधून गर्दीच्या वेळी प्रवासी पडण्याच्या घटना घडत आहेत. डेपोमध्ये अनेक बस दुरुस्त करतात; मात्र बस दुरुस्ती झाल्यावर दोन पत्र्यांमधील नट-बोल्ट न लावल्याने मागील तीन महिन्यात दोन कर्मचारी गंभीर जखमी झाल्याची घटना घडल्या आहेत.

-------------------
पत्रा लागून गंभीर दुखापत
केडीएमटी कर्मचारी राजेश खरे (वय ५०) हे १६ वर्षांपासून केडीएमटीमध्ये कार्यरत आहेत. २८ डिसेंबर २०२२ रोजी रात्री ११.३० च्या सुमारास मलंग रोडवरून कल्याणच्या दिशेने येत असताना बसमधील दोन पत्र्यांना नट-बोल्ट न लावल्याने एक पत्रा लागून खरे गंभीर जखमी झाले; तर दुसऱ्या घटनेत सुनील तडवी (वय ४८) कोकण भवनवरून येत असताना बसमध्ये जखमी झाले आहेत.

-------------------
कर्मचारी संघटना आक्रमक
नादुरुस्त बसबाबत कर्मचाऱ्यांनी तक्रारी करूनही केडीएमटी डेपोमधील कार्यशाळांमधील अधिकारी नादुरुस्त बस चालवण्याची जबरदस्ती करत आहेत. यामुळे कर्मचारी आणि प्रवाशांच्या जीवाशी खेळ सुरू असून सरकारी यंत्रणांचे लक्ष वेधण्यासाठी गुरुवारी (ता. १६) धडक मोर्चा काढणार असल्याची माहिती परिवहन मजदूर युनियन अध्यक्ष प्रफुल्ल म्हात्रे यांनी दिली. कर्मचारी संघटनेचे आंदोलन पाहता कल्याण आरटीओ विभागाने गंभीर दखल घेत विशेष पथकाची निर्मिती करत केडीएमटी बसेस तपासणी सुरू केली आहे. खराब बस डेपोमधून बाहेर काढू नका, अशा सूचना केडीएमटी प्रशासनाला दिल्याची माहिती कल्याण आरटीओ उपप्रादेशिक परिवहन अधिकारी विनोद साळवी यांनी दिली.

------------
संघटनेच्या तक्रारींची दखल घेऊन डेपोमधील बसबाबत अहवाल सादर करण्याचे आदेश कार्यशाळा प्रमुखाला दिले आहेत. संघटनेने आंदोलन न करता चर्चा करावी. यातून तोडगा निघू शकतो.
- डॉ. दिपक सावंत, केडीएमटी व्यवस्थापक

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com