खैर तस्कर पुन्हा सक्रिय | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

खैर तस्कर पुन्हा सक्रिय
खैर तस्कर पुन्हा सक्रिय

खैर तस्कर पुन्हा सक्रिय

sakal_logo
By

मनोर, ता. १३ : वनविभागाच्या दहिसर तर्फे मनोर वनपरिक्षेत्र हद्दीत खैर तस्कर पुन्हा एकदा सक्रिय झाले आहेत. होळीच्या दिवशी नावझे गावच्या हद्दीतील जंगलात आठ ते दहा खैराच्या झाडांची कत्तल करण्यात आली आहे. दहिसर वनपरिक्षेत्राचे गस्ती पथक आणि कर्मचाऱ्यांच्या दुर्लक्षामुळे खैर तस्करांचे फावले असून खैराची कत्तल आणि तस्करी पुन्हा सुरू झाली असल्याचे पर्यावरणप्रेमी नागरिकांमधून बोलले जात आहे.
वनविभागाच्या दहिसर तर्फे मनोर वनपरिक्षेत्र हद्दीतील वरई-पारगाव रस्त्यावर गुंदावे, दहिसर आणि नावझे गावच्या हद्दीत रस्त्यालगत तसेच रस्त्यापासूनच्या काही अंतरावर मौल्यवान खैराच्या झाडांची संख्या मुबलक प्रमाणात आहे. खैराच्या झाडांच्या संरक्षणासाठी वनविभागाच्या गस्ती पथकाकडून वरई-पारगाव रस्त्यावर गस्त घातली जाते. तसेच वनविभागाचे कर्मचारी पायी गस्त घालत असतात. गस्ती पथकातील कर्मचारी आणि राउंडच्या कर्मचाऱ्यांकडून जंगलात खैर तस्करांच्या संशयास्पद हालचालींवर लक्ष ठेऊन खैर तस्करीवर लगाम घातली जाते.

---------------
आठ ते दहा झाडांची चोरी
वरई-पारगाव रस्त्यावरील नावझे गावाच्या हद्दीतील जंगलात खैराच्या आठ ते दहा झाडांची कत्तल केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. होळीच्या दिवशी खैराच्या झाडांची कत्तल करण्यात आल्याची माहिती समोर येत आहे. खैराच्या झाडांची मुबलक संख्या असलेल्या असलेल्या वरई-पारगाव रस्त्यावर रात्रीच्या वेळी गस्त वाढवून खैराच्या झाडांची कत्तल आणि तस्करी रोखण्यासाठी कठोर उपाययोजना करण्याची मागणी पर्यावरणप्रेमी नागरिकांकडून केली जात आहे. कटर मशिनचा वापर करून खैर तस्करांनी झाडांची कत्तल केल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे.

-------------------
होळी सणाच्या वेळी खैराच्या झाडांची तोड करण्यात आली होती. आठ ते दहा झाडे कापण्यात आली असून अज्ञात व्यक्तींच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुन्हा झालेले ठिकाण वाटप क्षेत्र असून सातबारा उतारे घडलेले आहेत. खैराच्या झाडांची तोड करणाऱ्यांचा शोध घेण्याचे काम सुरू आहे. झाडे कापल्याच्या माहितीची घटनास्थळी भेट देऊन शहानिशा करण्यात येईल. खैर तस्करी रोखण्यासाठी कडक उपाययोजना करण्यात येतील.
- नम्रता हिरे, वन परिक्षेत्र अधिकारी