
ऑटो डीसीआर प्रणाली वापरण्यास मान्यता
नवी मुंबई, ता. १३ : नवी मुंबई महापालिकेस प्राप्त होणाऱ्या विकास प्रस्तावांची छाननी सरकार निर्देशानुसार ऑनलाईन होत आहे. सरकारने १२ ऑगस्टच्या पत्रान्वये बीपीएमएस संगणक प्रणाली व्यतिरिक्त सॉफ्टटेक कंपनीने तयार केलेली ऑटो डीसीआर प्रणालीही वापरण्यास मान्यता दिली आहे. या प्रणालीचा उपयोग करून ऑनलाईन बांधकाम परवानगी देण्याच्या कार्यवाहीस सुरुवात केली आहे.
पालिकेत ही कार्यप्रणाली नियमितपणे राबवली जावी, या दृष्टीने प्रयत्न करण्यात येत आहेत. या प्रणालीद्वारे ऑनलाईन बांधकाम परवानगी प्राप्त करण्याच्या कार्यप्रणालीत वापरकर्त्यांच्या अडचणी दूर करण्यासाठी महापालिका आयुक्त राजेश नार्वेकर यांच्या निर्देशानुसार नगररचना विभागामार्फत महापालिका मुख्यालयातील ज्ञानकेंद्रात विशेष कार्यशाळा झाली. या कार्यशाळेमध्ये नवी मुंबई महापालिकेच्या नगररचना विभागातील उपअभियंता, शाखा अभियंता व कनिष्ठ अभियंता, विविध विकासक, वास्तुविशारद व त्यांचे प्रतिनिधी सहभागी झाले होते. महापालिकेचे सहायक संचालक नगररचना सोमनाथ केकाण यांनी कार्यशाळेच्या आयोजनामागील भूमिका विशद करत या प्रणालीचा वापर जास्तीत जास्त व्हावा, या दृष्टीने कार्यशाळेच्या माध्यमातून समन्वयाचे काम नवी मुंबई महापालिका करत असल्याचे सांगितले.
महानगरपालिका क्षेत्रातील वास्तुविशारद आणि विकसकांच्या अडचणी सोडवण्यासाठी महापालिका नेहमीच कटिबद्ध आहे. त्या दृष्टीने ही कार्यशाळा लाभदायी ठरेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. सॉफ्टटेकच्या वतीने निखिल कापसे, अंकित पटाणी व सचिन सिन्नकर यांनी या प्रणालीच्या वापराविषयी उपस्थितांना मार्गदर्शन केले. प्रीडीसीआर स्वतंत्र सॉफ्टवेअरमध्ये वास्तुविशारद जे ऑटोकॅड वापरतात त्या आवृत्तीशी सुसंगत आहे. ऑटो डीसीआर संगणक प्रणालीमध्ये सादर करण्यापूर्वी हे नकाशे प्रमाणित करून येतात. प्रत्येक प्रकल्पाचे रिअल-टाइम ट्रॅकिंग करता येते. ही संगणक प्रणाली वापरकर्त्यांना कळायला आणि वापरायला सोपी आहे, याचे त्यांनी प्रात्यक्षिक स्वरूपात दाखवून दिले.