कल्याण लोकसभेसह २७ गावांचा पाणीप्रश्न सुटणार | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

कल्याण लोकसभेसह २७ गावांचा पाणीप्रश्न सुटणार
कल्याण लोकसभेसह २७ गावांचा पाणीप्रश्न सुटणार

कल्याण लोकसभेसह २७ गावांचा पाणीप्रश्न सुटणार

sakal_logo
By

सकाळ वृत्तसेवा
ठाणे, ता. १३ : कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेच्या अखत्यारीतील २७ गावे आणि उल्हासनगर, ठाणे, दिवा, कळवा येथील नागरिकांच्या पाणी समस्या मार्गी लावण्यासाठी खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या पुढाकाराने राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत यांच्या अध्यक्षतेखाली सोमवारी महत्वाची बैठक पार पडली. या बैठकीत पाणी नियोजन संदर्भातील सर्व समस्या सोडविण्यासाठी महापालिका आणि एमआयडीसी प्रशासनाने तात्काळ उपायोजना राबवण्याच्या सूचना या वेळी उदय सामंत यांनी दिल्या. त्यामुळे २७ गावांसह कल्याण लोकसभा मतदारसंघातील पाणी प्रश्न लवकरच सुटणार आहे.

कल्याण लोकसभा मतदारसंघातील रस्ते तसेच पाण्याचे प्रश्न मार्गी लावण्यासाठी खासदार डॉ. श्रीकांत शिंदे हे कायम आग्रही असतात. त्यांच्या पुढाकाराने मतदारसंघात अनेक विकासकामांना गती मिळत आहे. याच पार्श्वभूमीवर कल्याण-डोंबिवली पालिका क्षेत्रात येणाऱ्या पिसवली, गोळवली, देशमुख होम्स, दावडी, सोनारपाडा, उसरघर, संदप, आजदेसह २७ गावांमध्ये गेल्या काही आठवड्यांपासून पाण्याची तीव्र समस्या जाणवत आहे. त्यातून मार्ग काढण्यासाठी खासदार डॉ. शिंदे यांनी पुढाकार घेत सोमवारी (ता. १३) उद्योगमंत्री उदय सामंत यांच्या अध्यक्षतेखाली एक बैठक घेतली. या वेळी पालिकाआणि एमआयडीसी अधिकारी उपस्थित होते.

----------------------
तांत्रिक बाबींचा निपटारा करा
कल्याण-डोंबिवली महापालिका क्षेत्रात येणाऱ्या २७ गावांतील नागरिकांना एमआयडीसीकडून मुबलक पाणी मंजूर करण्यात आले आहे. तरीही त्यांना अत्यंत कमी दाबाने पाणीपुरवठा होत असल्याचे या वेळी खासदार डॉ. शिंदे यांनी उदय सामंत यांचानिदर्शनास आणून दिले. त्यावर कोणत्या तांत्रिक बाबींमुळे नागरिकांना पाणी मिळत नाही. त्याचा तात्काळ शोध घ्यावा. याबरोबरच येत्या एक आठवड्याच्या कालावधीत या गावांतील नागरिकांना मुबलक पाणी देण्यात यावे. असे न झाल्यास सर्व विभागाच्या संबंधित अधिकाऱ्यांवर योग्य ती कारवाई केली जाईल, अशा स्पष्ट सूचना उदय सामंत यांनी या वेळी दिल्या.

-------------------
टँकर लॉबीवर कठोर कारवाई करा
एमआयडीसी आणि महापालिकेच्या पाईपलाईनमधून पाणी चोरणाऱ्या टँकर लॉबीवर कठोर कारवाई करण्यात येणार असून यासाठी महापालिका आणि पोलिस प्रशासन संयुक्तरित्या कारवाई करणार असल्याचेही उदय सामंत यांनी यावेळी स्पष्ट केले. मतदासंघातील शहरांमधील धाबे, हॉटेल, गॅरेज या व्यावसायिक कामासाठी वापरल्या जाणाऱ्या अनधिकृत नळ जोडण्या लागलीच तोडण्यात याव्या अशा सूचनाही खासदार डॉ. शिंदे यांनी संबधित अधिकाऱ्यांना दिल्या. तसेच पाण्याचे दर हे व्यावसायिक, घरगुती आणि व्यापारी या निकषांनुसारच आकारले जाणार असल्याचेही मंत्री उदय सामंत यांनी सांगितले.