
अपंगत्वावर मात करत वाचवले तरुणाचे प्राण
सकाळ वृत्तसेवा
ठाणे, ता. १३ : ठाण्यातील नौपाडा परिसरात शिवशाही बस आणि रिक्षाचा अपघात झाल्याची घटना घडली होती. या अपघातात पादचारी तरुण जखमी झाला होता. या तरुणाला नौपाड्यात ३० वर्षांच्या दिव्यांग निशांतने नजीकच्या रुग्णालयात दाखल करून त्याला जीवदान देण्याचे काम केले. त्यामुळे निशांतवर सर्वच स्तरांतून कौतुकाचा वर्षाव होत आहे.
इच्छाशक्तीच्या जोरावर अनेक गोष्टी साध्य करू शकत असल्याचे नौपाड्यातील निशांत गोखलेने दाखवून दिले आहे. मागील आठवड्यात शुक्रवारी दुपारी १२ च्या सुमारास झालेल्या गोखले रोडवरील रिक्षा आणि शिवशाही बसच्या धडकेत एक पादचारी तरुण जखमी झाला. परिसरात बघ्याचींही गर्दी खूप होती; पण जखमीला तात्काळ रुणालयात नेऊन त्याचे प्राण वाचवण्यासाठी कोणीच पुढे येत नव्हते. या वेळी कोपरी विभाग वाहतूक उपनिरीक्षक प्रवीण जाधव आणि निशांतने क्षणाचाही विलंब न करता त्या पादचारी व्यक्तीला तात्काळ नजीकच्या रुग्णालयात उपचारासाठी दाखल करून त्याचा जीव वाचविला.
...............
दुसऱ्याच्या चुकीची निशांतला शिक्षा
पाचपाखाडी येथे राहणारा निशांत गेल्या १३ वर्षांपासून दुसऱ्याच्या चुकीची शिक्षा भोगत आहे. महामार्गावर एका मद्यपी वाहनचालकाने दिलेल्या धडकेमध्ये त्याच्या एका हाताला अपंगत्व आले. आयुष्यात अनेक नकारात्मक गोष्टींना बाजूला सारून तो आयुष्याकडे आशेने पाहण्याचा प्रयत्न करत आहे. तसेच आपल्यापरीने जेवढी मदत करता येईल त्यासाठी तो नेहमीच तत्पर असतो.