
विठ्ठलवाडी स्थानकातील पादचारी पूल बंद
कल्याण, ता. १३ (बातमीदार) : मध्य रेल्वेच्या कल्याण कर्जत रेल्वे स्थानकामधील विठ्ठलवाडी रेल्वे स्थानकामधील एका पादचारी पुलाच्या जिन्याचे दुरुस्तीचे काम हाती घेण्यात आले आहे. हा पूल एक महिन्याच्या कालावधीकरीता प्रवासी वर्गासाठी बंद करण्यात आला असून, प्रवाशांनी विठ्ठलवाडी रेल्वे स्थानकामधील मुंबईच्या दिशेने असलेल्या नवीन पादचारी पुलाचा वापर करण्याचे आवाहन रेल्वेच्या वतीने करण्यात आले आहे .
मध्य रेल्वेच्या कल्याण ते कर्जत रेल्वे स्थानकादरम्यान विठ्ठलवाडी रेल्वे स्थानक असून, त्या रेल्वे स्थानकामधून प्रतिदिन जवळपास ३० हजार प्रवासी प्रवास करतात. त्या रेल्वे स्थानकाच्या कर्जत दिशेने असलेल्या पादचारी पुलाच्या पश्चिमेला असलेल्या जिन्याचे काम सुरू असल्याने रेल्वे प्रवासी व नागरिकांसाठी ९ मार्चपासून ८ एप्रिलपर्यंतच्या काळात जिना बंद करण्यात आल्याने, प्रवाशांनी पर्यायी व्यवस्था म्हणून बाजूच्या लिफ्ट अथवा मुंबईच्या दिशेने असलेल्या पादचारी पुलाचा वापर करण्याचे आवाहन रेल्वे प्रशासनच्या वतीने करण्यात आले आहे .