जनविरोधाची महापालिकेवर धडक

जनविरोधाची महापालिकेवर धडक

कामोठे, ता. १३ (बातमीदार) : पनवेल महापालिकेने लादलेल्या मालमत्ता कराविरोधात नागरिकांमध्ये असंतोषाचे वातावरण निर्माण आहे. याच अनुषंगाने महाविकास आघाडीने सोमवारी (ता. १३) महापालिकेवर काढलेल्या जनआक्रोश मोर्चामध्ये रणरणत्या उन्हात हजारोंच्या संख्येने नागरिक सहभागी झाले होते. यावेळी मोर्चेकऱ्यांनी महापालिका, तत्कालीन सत्ताधारी भाजपविरोधात घोषणाबाजी करत मालमत्ता कराविरोधातील रोष व्यक्त केला आहे.
तत्कालीन भाजप लोकप्रतिनिधींच्या पाठिंब्यावर पनवेल महापालिकेने पूर्वलक्षी प्रभावाने मालमत्ता कर आकारणी सुरू केली आहे. तत्कालीन विरोधी पक्षाने याविरोधात सभागृहात आवाज उठवला होता. मात्र बहुमताच्या जोरावर सत्ताधाऱ्यांनी विरोधकांच्या गळचेपीचे धोरण अवलंबले होते. याविरोधात महाविकास आघाडीने एकत्रित येऊन मालमत्ता कराविरोधात रणशिंग फुंकले होते. याची झलक मालमत्ता कराविरोधात काढण्यात आलेल्या जनआक्रोश मोर्चातही पाहावयास मिळाली. यावेळी आघाडीच्या नेत्यांनी काही दिवसांपासून महापालिका क्षेत्रामध्ये केलेल्या जनजागृतीचे सकारात्मक पडसाद मोर्चातही पाहावयास मिळाले. पनवेल शहरातील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पूर्णाकृती अश्वारूढ पुतळ्याला अभिवादन करून निघालेल्या या मोर्चात हजारोंच्या संख्येने नागरिक सहभागी झाले होते. यावेळी महापालिकेसह तत्कालीन सत्ताधाऱ्यांविरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. तसेच कोणत्याही परिस्थितीत पनवेलकरांवर लादलेला मालमत्ता कराचा बोझा हटवण्याची मागणी आंदोलकांनी केली.
------------------------------------------
‘मविआ’च्या नेत्यांची उपस्थिती
यावेळी माजी आमदार बाळाराम पाटील, ज्येष्ठ शेकाप नेते जे. एम. म्हात्रे, माजी विरोधी पक्षनेते प्रीतम म्हात्रे, नारायण घरत, काशिनाथ पाटील, शिवसेना नेते बबन पाटील, शिरीष घरत, काँग्रेस नेते आर. सी. घरत, सुदाम पाटील, राष्ट्रवादी काँग्रेस नेते प्रशांत पाटील, सतीश पाटील, खारघर फोरम अध्यक्षा लीना गरड, माजी नगरसेवक, नगरसेविका, महाविकास आघाडीचे पदाधिकारी, कार्यकर्ते, नागरिक विशेषतः महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.
----------------------------------------
लक्ष्यवेधी घोषणांमधून निषेध
पनवेल पालिकेची डबल टॅक्सची मागणी, नाही भरणार आम्ही कोणी, आजका हमारा एकही नारा, नही भरेंगे प्रॉपर्टी टॅक्स दोहरा, चलो पनवेल, चलो पनवेल, महापालिकेने लादलेल्या वाढीव जिझिया मालमत्ता कराविरोधाचा निषेध करणाऱ्या आशयाचे फलक हातामध्ये घेऊन नागरिक आपल्या भावनांना वाट मोकळी करून देत होते. घोषणाबाजीने मालमत्ता कराचा जाहीर निषेध करत होते.
---------------------------------
रणरणत्या उन्हामध्ये उत्साह शिगेला
कर्नाळा सर्कल, जुने तहसील कार्यालय, जयभारत नाका मार्गे मोर्चा दुपारी महापालिकेवर धडकला. महापालिकेसमोरील मोकळ्या जागेत मोर्चाचे सभेमध्ये रूपांतर झाले. यावेळी रणरणत्या उन्हामध्ये देखील आंदोलकांचा उत्साह दिसून आला; तर आयोजकांनी नागरिकांना पिण्याचे पाणी, नाश्त्याची व्यवस्था केली होती.
------------------------
१५ दिवसांत मुख्यमंत्र्यांसोबत बैठक
मोर्चेकऱ्यांच्या शिष्टमंडळाने आयुक्त गणेश देशमुख यांची भेट घेऊन विविध मागण्या असलेले लेखी निवेदन दिले. याप्रसंगी आयुक्तांनी शिष्टमंडळाला १५ दिवसांत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत मंत्रालयात बैठक घेऊन मालमत्ता कर आकारणीचा गुंता सोडवण्याचे तोंडी आश्वासन दिले आहे.
-----------------------------------------------------
महाविकास आघाडीची प्रमुख मागणी
- १ ऑक्टोबरपासून पुढील ५ वर्षांपर्यंत कोणताही कर लावू नये.
़ः- ५०० चौरस फूट क्षेत्रफळ असलेल्या घरांना मालमत्ता कर लावू नये.
- नवीन कर आकारताना साधी करप्रणाली आकारली पाहिजे, साधारण प्रतिचौरस फूट ३० पैसे इतका कर आकारण्यात यावा.
- व्यापारी मालमत्ता करधारकांवर जप्तीची कारवाई करू नये.
- ३१ मार्च २०२३ पर्यंत कोणत्याही प्रकारची शास्ती आकारणी बंद करावी.
- पनवेल शहराला ३० टक्के माफी करून बिल अदा करावे.
ः----------------------------------------------
महाविकास आघाडीने नागरिकांच्या जिव्हाळ्याचे प्रश्न सोडवण्यासाठी नेहमीच पुढाकार घेतला आहे. मालमत्ता करातून नागरिकांना दिलासा देण्याचा प्रामाणिक प्रयत्न सुरू आहे. राजकीय विरोधक जनमानसात संभ्रमाचे वातावरण निर्माण करत आहेत. सुज्ञ जनता भूलथापांना बळी पडणार नाही.
- बाळाराम पाटील, माजी आमदार, शेकाप
-----------------------------------------------
कोविडमुळे नागरिकांचे मोठे नुकसान झाले आहे. मालमत्ता कराचा फटका सर्वसामान्य नागरिकांना बसणार आहे. प्रशासनाला नागरिकांच्या परिस्थितीची जाणीव नाही. त्यामुळे महाविकास आघाडीने मालमत्ता कराविरोधात जनआक्रोश मोर्चा काढला आहे.
- बबन पाटील, रायगड जिल्हा सल्लागार, शिवसेना ठाकरे गट

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com