
आश्रमशाळा संलग्न व्यवसाय प्रशिक्षण केंद्रे बंद
मुंबई, ता. १३ (बातमीदार) ः राज्यातील शासकीय आदिवासी पोस्ट बेसिक आश्रमशाळा (शासकीय आश्रम) संलग्न १५ व्यवसाय प्रशिक्षण केंद्र बंद करण्याचा निर्णय आदिवासी विकास विभागाने घेतला आहे. अनेक वर्षांपासून निधी न मिळाल्याने हा निर्णय घेतल्याचे बालले जात आहे.
शासकीय आश्रमशाळा संलग्नित सुरू करण्यात आलेले व्यवसाय प्रशिक्षण केंद्रास २०१३-१४ पासून शासनाचा निधी प्राप्त झालेला नाही. तसेच योजना सुरू केली तेव्हाची तंत्रशिक्षणाची व्यवस्था व आताची व्यवस्था यात तुलना केली असता सध्याची स्थिती खूपच सुधारलेली असून आता प्रत्येक तालुक्यात शासकीय, खासगी औद्योगिक प्रशिक्षण संस्था कार्यरत आहेत. त्यापैकी आदिवासी उपयोजना क्षेत्रातील शासकीय औद्योगिक प्रशिक्षण केंद्रांचा निधी आदिवासी विकास विभागाकडून उपलब्ध करून देण्यात येतो. तसेच व्यवसाय प्रशिक्षण केंद्र ही योजना बंद करण्याबाबत बहुतांश प्रकल्प कार्यालयांनी शिफारस केली असल्याचे सांगण्यात आले आहे.
प्रशिक्षण केंद्रामधील साधनसामग्री जुनी व प्रशिक्षणासाठी उपयोगाची राहिलेली नाही. त्यातच प्रशिक्षण केंद्रे बंद असतानाही काही कर्मचाऱ्यांच्या नियुक्ती सुरू ठेवून त्यांना अन्य काम देण्यात आल्याची आक्षेपार्ह बाब समोर आली आहे. त्यामुळे राज्य शासनाने याविषयी अभ्यास करण्यासाठी नेमलेल्या समितीच्या शिफारशीनुसार केंद्र पुरस्कृत शासकीय आदिवासी आश्रम शाळा संलग्न व्यवसाय प्रशिक्षण केंद्रे बंद करण्यात आली आहेत. त्याअनुषंगाने योजनेंतर्गत नियुक्ती सुरू असलेल्या कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या सेवा तातडीने संपुष्टात आणण्याचे आदेश आदिवासी विकास विभागाने राज्याच्या आदिवासी विकास आयुक्तांना दिले आहेत. तसेच प्रशिक्षण केंद्रामधील वापरण्यायोग्य साहित्य जवळच्या शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत देण्याचे आदेशही देण्यात आले आहेत.
ही प्रमुख केंद्रे बंद
कोटगुल, तालुका कोरची, जिल्हा गडचिरोली
कसनसूर, तालुका भामरागड, जिल्हा गडचिरोली
विनवल, तालुका जव्हार, जिल्हा ठाणे
पाथरज, तालुका कर्जत, जिल्हा रायगड
पळसन, तालुका कळवण, जिल्हा नाशिक
भांगरापाणी, तालुका अक्कलकुवा, जिल्हा नंदुरबार