उद्यापासून शिवतीर्थावर ‘जाणता राजा’ रंगणार

उद्यापासून शिवतीर्थावर ‘जाणता राजा’ रंगणार

मुंबई, ता. १३ : हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनावरील प्रेरणादायी ‘जाणता राजा’ हे महानाट्य शिवतीर्थ अर्थात शिवाजी पार्कवर उद्यापासून (मंगळवार, १४ मार्च) रंगणार आहे. रविवार १९ मार्चपर्यंत रोज सायंकाळी ६.४५ वाजता प्रयोग सादर केला जाणार आहे. विशेष म्हणजे रसिकांना प्रवेश विनामूल्य असणार आहे.
या महानाट्याचे आयोजन मुंबई भारतीय जनता पक्षाचे अध्यक्ष ॲड. आशीष शेलार यांनी केले आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांचा इतिहास आणि जीवनचरित्र सांगणारे, महाराष्ट्रभूषण शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांच्या कल्पकतेतून साकारलेले ‘जाणता राजा’ या महानाट्याची सहा प्रयोगांची मालिका १४ ते १९ मार्च या कालावधीत रोज सायंकाळी आयोजित केली आहे. या महानाट्याच्या विनामूल्य प्रवेशिका मुंबईतील शिवाजी मंदिर (दादर), प्रबोधनकार ठाकरे नाट्यगृह (बोरिवली), दीनानाथ मंगेशकर नाट्यगृह (विलेपार्ले), कालिदास नाट्यगृह (मुलुंड) आणि दामोदर नाट्यगृह (परेल) या ठिकाणी ९ मार्चपासून उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. रोज सुमारे १० हजार प्रेक्षकांना हे महानाट्य पाहण्याची व्यवस्था करण्यात आली आहे.
महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनचरित्रावरील सर्वांत मोठे असे पाच मजली भव्य रंगमंचावरील हे ऐतिहासिक महानाट्य असून फिरता रंगमंच हे त्याचे खास आकर्षण आहे. तसेच आकर्षक प्रकाश योजना, प्रत्यक्ष घोडे, बैलगाड्यांचा समावेश असल्याने ते लोकप्रिय आहे. महानाट्यामध्ये २५० हून अधिक कलाकार, नेत्रदीपक आतषबाजी आणि नवीन रंगमंचासहित शिवजन्म पूर्वकाळ, शिवजन्म, शिवरायांचा न्यायनिवाडा, रांझ्याच्या पाटलाला दिलेली शिक्षा, अफझलखान वध, सुरत छापा, शाहिस्तेखानाची फजिती, आग्र्याहून सुटका आणि रोमहर्षक राज्याभिषेक सोहळा अशा अनेक प्रसंगांचे सादरीकरण केले जाणार आहे.
...
महानाट्याचा आनंद घ्या!
छत्रपतींचा आशीर्वाद घेऊन भाजप सदैव छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांवर वाटचाल करते आहे. नव्या पिढीपर्यंत महाराजांचे महान कार्य पोहोचवण्याचा हा आमचा प्रयत्न असून हा प्रयोग म्हणजे मुंबईकरांना प्रेरणा देणाराच ठरेल. छत्रपती शिवाजी महाराज यांचे चरित्र हे विलक्षण प्रेरणादायी आहे, म्हणूनच सर्व मुंबईकरांनी शिवचरित्र अनुभवण्यासाठी जाणता राजा महानाट्य पाहण्याचा आनंद घ्यावा, असे आवाहन मुंबई भारतीय जनता पार्टीचे अध्यक्ष ॲड. आशीष शेलार यांनी केले आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com