
आझाद मैदानात कंत्राटी नर्सेसचा शिंदे फडणवीस सरकार विरोधात हल्लाबोल
राज्यभरातील कंत्राटी परिचारिकांचे कायम नोकरीसाठी आंदोलन
आझाद मैदानात सरकारविरोधात हल्लाबोल
मुंबादेवी, ता. १३ (बातमीदार) ः राज्यातील आरोग्य खात्यामधील कंत्राटी परिचारिकांनी आज आपल्या मागण्यांसाठी हल्लाबोल करीत आझाद मैदानात आंदोलन केले. कायमस्वरूपी
नोकरीसाठी त्यांनी घोषणाबाजी करत आझाद मैदान दणाणून सोडले.
महाराष्ट्र राज्य आरोग्य खाते कंत्राटी नर्सेस युनियनचे अध्यक्ष दिलीप उटाणे, कार्याध्यक्ष रेखा टरके, सरचिटणीस संगीता रेवडे, अंजली राठोड, स्वप्नाली ठक्कर आणि संजय देशमुख यांच्या नेतृत्वाखाली सकाळी साडेनऊपासून बेमुदत धरणे आंदोलन सुरू करण्यात आले. आंदोलनात सहभागी झालेल्या जवळपास ९०० परिचारिकांनी संताप व्यक्त केला. सरकारच्या आडमुठेपणाचा निषेध करत घोषणाबाजी केली. कायम नोकरीची मागणी करत आंदोलनात राज्यातील ३६ जिल्ह्यांतील परिचारिका सहभागी झाल्या होत्या. २४ तास सेवा देऊनही अवघ्या १७ हजार पगारात संसाराचा गाडा हाकणे कठीण झाले आहे. १७ वर्षे काम केल्याने आम्हाला नोकरीत कायम करावे. तो आमचा हक्कच असल्याने आम्हाला कायमस्वरूपी सेवेत घ्यावे, अशी त्यांची मागणी होती.
परभणीचे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे खासदार संजय जाधव यांनी आंदोलनात सहभागी होत शिंदे-फडणवीस सरकारवर टीका केली. शिवसेना कायम परिचारिकांसोबत आहे. सर्व परिचारिकांनी कोरोना काळात जीव धोक्यात घालून अनेकांचे प्राण वाचवले. त्यांना नोकरीत कायम करणे त्यांचा हक्क असून तो त्यांना मिळेपर्यंत आम्ही गप्प बसणार नाही. प्रसंगी रस्त्यावर आंदोलन उभारू, असा इशारा त्यांनी राज्य सरकारला दिला आहे.
अनुभवाच्या आधारे कायम करा!
आरोग्य खात्यातील कायमस्वरूपी सेवेत असलेल्या परिचारिकांना ७० ते ८० हजार मासिक पगार मिळतो. आम्ही २४ तास ग्रामीण भागात सेवा देताना आमच्या हातात अवघे १७ हजार रुपये वेतन येते. त्यात घरखर्च कसा भागवायचा, असा प्रश्न तुळजापूरहून आलेल्या परिचारिका सविता गोरे यांनी उपस्थित केला. आता आमचे वय परीक्षा देण्याचे राहिलेले नाही. त्यामुळे आम्हाला अनुभवाच्या आधारे कायम करावे. आमच्याकडे दहा ते सतरा वर्षांचा अनुभव आहे असेही त्या म्हणाल्या. कोविड काळात कुटुंबाची आणि जीवाची पर्वा न करता आम्ही दिवस-रात्र जनतेची आणि रुग्णांची सेवा केली. ‘गरज सरो वैद्य मरो’ म्हणीप्रमाणे आम्हाला वाऱ्यावर सोडू नका, असे परभणीहून आलेल्या अंजली राठोड म्हणाल्या. परिचारिका संगीता रेवडे, उस्मानाबादच्या रमा घोबाळे, रत्नागिरीतील सुप्रिया पाटकर, सुमन फुले इत्यादींनीही अशाच भावना व्यक्त केल्या.
सरकार म्हणते पैसा नाही, मग कायम कसे करणार. सरकार दिशाभूल करत आहे. आरोग्य सेवेत काम करणाऱ्या परिचारिकांच्या कुटुंबांचे आरोग्य आणि नोकरी सुरक्षित ठेवणे सरकारचे कर्तव्य आहे. आम्हाला नोकरीत कायम करायलाच हवे.
- रेखा टरके, आंदोलनाच्या नेत्या