आवक वाढल्याने हापूसचे दर घसरले | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

आवक वाढल्याने हापूसचे दर घसरले
आवक वाढल्याने हापूसचे दर घसरले

आवक वाढल्याने हापूसचे दर घसरले

sakal_logo
By

वाशी, ता. १३ (बातमीदार) : वाशीतील एपीएमसी बाजारात सध्या हापूसच्या आंब्याची जादा आवक सुरू झाली असून दरात घसरण पाहावयास मिळत आहे. सध्या बाजारात देवगड, रायगड आणि कर्नाटक येथून ३० हजार पेट्या आवक झाली आहे. यामध्ये सर्वाधिक पेट्या कोकणातील हापूसच्या आहेत. मात्र सध्या बाजारात ग्राहक नसल्याने हवा तसा हापूसला उठाव नाही. त्यामुळे दरातही घसरण झाली आहे.

मागील आठवड्यात चार ते सहा डझनाला दोन हजार ते सहा हजार रुपये दर होता; परंतु आता एक हजार ५०० ते चार हजारपर्यंत दर आहेत. यंदा बाजारात देवगड हापूसच्या हंगामाला उशिराने सुरुवात झाली. यंदा उत्पादन चांगले असेल, असा अंदाज आहे; परंतु मध्यंतरीच्या अवकाळी पावसाने उत्पादन लवकर काढण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे बाजारात मागील वर्षीपेक्षा फेब्रुवारी-मार्चमध्ये तीन ते चारपटीने आवक वाढली आहे. होळीनंतर बाजारात हापूसची आवक वाढण्यास सुरुवात झाली आहे. या आठवड्यापासून बाजारात पंधरा ते पंचवीस हजारांपर्यंत हापूसच्या पेट्या दाखल झाल्या आहेत.

दर उतरले आहेत
मागील आठवड्यात प्रतिपेटी दोन ते सहा हजार रुपयांना उपलब्ध होती; परंतु आता आवकही वाढली असून मालाला उठाव कमी असल्याने दर उतरले आहेत. मागील आठवड्यात दोन ते सहा हजार रुपयांवर विक्री होणारी पेटी आता एक हजार ५०० ते चार हजार रुपयांनी विक्री होत आहे.

सोमवारी बाजारात हापूस आंब्याच्या एकूण ३० हजार पेट्या दाखल झाल्या असून यामध्ये २१ हजार कोकणातील; तर रायगड, कर्नाटक येथून नऊ हजार पेट्या दाखल झाल्या आहेत; परंतु सध्या बाजारात ग्राहक नसल्याने हापूसला मागणी कमी आहे. पाडव्यानंतर बाजारात हापूसची आवक आणखीन वाढेल, तसेच ग्राहकही खरेदीला येतील.
- संजय पानसरे, व्यापारी