
ओशिवरात फर्निचर गोदामाला आग
मुंबई, ता. १३ : ओशिवरा येथील फर्निचर गोदामाला सोमवारी (ता. १३) सकाळी ११.१५ सुमारास लागलेल्या भीषण आगीत अनेक दुकाने जळून खाक झाली. अग्निशमन दलाच्या जवानांच्या शर्थीच्या प्रयत्नांनंतर आग नियंत्रणात आणण्यात आली. दरम्यान, या आगीत कोणतीही जीवितहानी झाली नसली तरी वित्तहानी मोठ्या प्रमाणात झाली.
ओशिवराच्या घास कम्पाऊंडमधील फर्निचर गोडाऊनला सोमवारी सकाळी आग लागली. आगीमुळे परिसरात धुराचे मोठे लोट पसरले. घटनेबाबत माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या तब्बल १२ ते १४ गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या. जवळपास दीड तासाच्या अथक प्रयत्नांनंतर अग्निशमन दलाच्या जवानांना आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आले; मात्र या आगीत फर्निचरचे तब्बल २० ते २५ गाळे जळून खाक झाले. आगीमुळे परिसरातील मार्गांवर मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाली होती. दरम्यान, ही आग नेमकी कशामुळे लागली, याचे कारण अद्याप स्पष्ट झाले नाही.