
ठाण्यात घरपट्टी व पाणीपट्टीची विक्रमी वसुली
सकाळ वृत्तसेवा
ठाणे, ता. १४ : कोरोना काळात घरपट्टी आणि पाणीपट्टी थकवणाऱ्यांविरोधात ठाणे जिल्हा परिषदेने मोहीम हाती घेतली आहे. अशा तब्बल सव्वा लाख थकबाकीदारांना राष्ट्रीय लोकशाही अदालतच्या माध्यमातून नोटीस बजावण्यात आल्यानंतर पहिल्याच सुनवाणीत २६ हजार थकबाकीदारांनी ८ कोटी ४ लाख रुपयांची घरपट्टी, पाणीपट्टी भरली आहे. आतापर्यंतची ही विक्रमी वसुली असल्याने झेडपीच्या तिजोरीला लक्ष्मीदर्शन झाले असून विकास निधी उपलब्ध झाला आहे.
राष्ट्रीय लोकअदालतीमध्ये दिवाणी, फौजदारी, वैवाहिक, बँक वसुली प्रकरणे, मोटार अपघात नुकसानभरपाई, कौटुंबिक वाद, कामगारविषयक वाद, भूसंपादन प्रकरणे, वीज व पाणीविषयक देयक प्रकरणे, महसूल प्रकरणे तसेच दाखल पूर्व प्रकरणे इत्यादी प्रकरणे तडजोडीसाठी ठेवण्यात येत असतात. त्यानुसार ठाणे जिल्ह्यातील ग्रामीण भागातील घरपट्टी व पाणीपट्टी थकबाकीदारांकडून कर वसुली करण्यासाठी ठाणे जिल्हा परिषदेचे मुख्यकार्यकारी अधिकारी मनुज जिंदल यांनी पुढाकार घेतला. ग्रामपंचायत स्तरावरून थकबाकी खातेदारांना नोटिसा बजावण्यात आल्या होत्या. या नोटिशीला प्रतिसाद देत, काही थकबाकीदारांनी थकीत कर भरल्याने जिल्ह्याची घरपट्टी व पाणीपट्टीची विक्रमी वसुली झाली असल्याची माहिती जिल्हा परिषदेकडून देण्यात आली.
ठाणे जिल्ह्यातील अंबरनाथ, भिवंडी, कल्याण, मुरबाड आणि शहापूर या पाच तालुक्यातील एक लाख २१ हजार ५३४ खातेदारांना नोटिसा बजावण्यात आल्या. यामध्ये ९५ हजार खातेदार हे घरपट्टी खातेदार असून २५ हजार ५८४ हे पाणीपट्टी खातेदार आहे. यापैकी १९ हजार २१७ घरपट्टी खातेदारांकडून सर्वाधिक सात कोटी ३ लाख ९७ हजार ८७६ वसुली करण्यात आली असून ६ हजार ९४० पाणीपट्टी खातेदारांकडून एक कोटी १० हजार ९४० इतकी वसुली करण्यात आली आहे.
......................................
मुख्य कार्यकारी अधिकारी मनुज जिंदल यांच्या मार्गदर्शनाखाली ठाणे जिल्ह्यातील ग्रामपंचायत स्तरावर घरपट्टी व पाणीपट्टी थकबाकी वसुलीबाबत एक लाख २१ हजार ५३४ खातेदारांना नोटीसा बजावण्यात आल्या होत्या. त्यातून ८ कोटी ४ लाख इतकी वसुली करण्यात आली. ग्रामपंचायत स्तरावरील गटविकास अधिकारी व कर्मचाऱ्यांनी केलेल्या उल्लेखनीय कामामुळे हे यश गाठता आले.
- प्रमोद काळे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी (पंचायत), ठाणे, जि.प.
......................................
तालुका बजावलेल्या नोटीस वसूल खातेदार संख्या वसूल रक्कम
अंबरनाथ ६७७७ २०६८ ७२,७६,२६७
भिवंडी ५६५९७ ५९७९ ३,५८,९९,५०२
कल्याण १०५८२ २५१५ १,४७,६४,६६०
मुरबाड ५६६६ २२७३ ४३,९४,९६४
शहापूर ४१९१२ १३३२२ १,८०,७३,४२३